परिस्थितीने गांजले कुटुंबाने उपेक्षिले मुलांसह निलीमाला स्नेहालयाने स्वीकारले..!वाचा दर्दभरी कहानी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नीलिमाला ( बदललेले नाव ) विवाहनंतर असंख्य संकटांना एकाच वेळी तोंड द्यावे लागले.आर्थिक – सामाजिक तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या गुंतागुंतीच्या समस्या समोर उभ्या राहिल्या.त्यामुळे नाईलाजाने स्वतःच्या उपाशी मुलांना साखळीने बांधून ठेवून त्यांच्यासाठी भाकरीचे तुकडे शोधणाऱ्या मातेला आणि तिच्या 2 मुलांना स्नेहालय परिवारात हक्काचे घर आणि सुरक्षित निवारा मिळाला.एका वृत्तपत्रात यासंबंधी वाचल्यावर स्नेहालय संस्थेच्या मानसग्राम या मानसिक आरोग्यावरील प्रकल्पाची स्नेह मनोयात्री टीम राहुरी तालुक्यातील उंबरे गावात 20 मार्च रोजी धडकली. ही आई तेव्हा भाकरीचा चंद्र शोधायला भटकत होती. तिच्या चंद्रमोळी घरात तिची 2 मुलं तहान भुकेने कासावीस होऊन निपचित पडली होती.घराची अवस्था मोडकळीस आलेली.अंगावर भिंत पडून जीववर बेतण्याची शक्यता होती.सामान अस्ताव्यस्त रचून ठेवल्याने चुकून आग लागली तर जीव वाचवण्यासाठी बाहेर पळणे देखील शक्य नव्हते. मनोयात्री टीमला त्यांच्या घरात शिरताना भीती वाटली.
धोकादायक घर
एवढ्या छोट्याश्या घरात हे प्रचंड निरुपयोगी सामान कशाला ठेवले,” असे टीमने या ताईला विचारले.नीलिमा ने सांगितले की “हे सामान कामाचे आहे.मी दारोदारी,गल्लोगल्ली जाऊन चरितार्थासाठी गोळा केलेले हे भंगार आहे.यामध्ये असंख्य जुने कपडे,चप्पल,बाटल्या,डबे इ .भंगार हाच माझा जगण्याचा आधार आहे…” नीलिमा म्हणाली.यावर मनोयात्री टीमने विचारले की. “असे असूनही तुझी मुले कुपोषित आणि आजारी का दिसत आहेत ?” यावर निशब्द झालेल्या नीलिमाने अश्रूपात करून आपली हतबलता व्यक्त केली.गावात चौकशी केल्यावर समजले की, नीलिमाचे कुटुंब सुसंस्कृत राजकारणात वजनदार होते.तिच्या वडिलांनी, आणि आजोबांनी उंबरे गावाच्या विकासात समर्पित योगदान दिले. आई-वडिलांची एकुलती असलेली नीलिमा उच्चविद्याविभूषित आहे. वर्ष 2011 मध्ये तिने अहिल्यानगर येथील ‘सीएसआरडी’ (सेंटर फॉर स्टडीज ऑफ रूरल डेव्हलपमेन्ट) या संस्थेतून ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ अर्थात ‘एमएसडब्ल्यू’ ही पदवी प्राप्त केली आहे. परंतु नंतर कौटुंबिक , आर्थिक.आणि आरोग्य समस्यांनी तिला ग्रासले.
आई,वडिलांचा मृत्यू झाला. भावा बहिणीने नाते तोडले. पतीनेही दोन मुलांची जबाबदारी नीलिमालाच देऊन घटस्फोट दिला.समाजकार्याची पदवी असल्याने अनेक चांगल्या संस्थांमध्ये नोकरीची संधी नीलिमाला आली होती. पण ती नोकरीला गेल्यावर तिच्या दोन्ही लेकरांना कोण सांभाळणार हा प्रश्न होता.अखेरीस मुलांना जगवण्यासाठी दिली माने भंगार गोळा करण्याचे काम सुरू केले. परंतु पुरुषाचा आधार नसलेल्या बाईला समाज नीट जगू देत नाही. परिणामी दारोदार फिरण्याचा हा व्यवसायही नीलिमाला बंद करावा लागला . शिर्डी सोडून आपल्या वडिलांच्या उंबरे गावातील पडक्या घरात तिने मुलांचं आश्रय घेतला.
डोक्यावर सडलेले पत्रे.पडक्या भिंती,तुटके दार.घरात वीज नाही.वापरायला आणि प्यायला पाणी नाही.अशा परिस्थितीत ती जगण्याचा आणि मुलांना जगविण्याचा संघर्ष करत होती.तीन आठवड्यांपूर्वी शिर्डी बसस्थानक परिसरात एका मातेने आपल्या दोन मुलांना साखळी कुलपात बांधून ठेवल्याची एक बातमी माध्यमांमध्ये झळकली.स्नेहालयच्या स्नेह मनोयात्री टीमने या महिलेचा शोध सुरू केला.तेव्हा त्या महिलेला शिर्डीतून हुसकून दिल्याचे समजले.ती राहुरी तालुक्यातील उंबरे येथील वडिलांच्या घराकडे गेल्याचे आणि तेथे भंगाराचे संकलन करीत असल्याचे समजले.
ग्रामस्थांचा सहयोग
स्नेह मनोयात्री टीम उंबरे गावात गेल्यावर गावकऱ्यांनी आत्मीयतेने स्वागत करून नीलिमाची व्यथा सांगितली. कोणाचाही आधार नसल्याने तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांमुळे तिचे आणि तिच्या बालकांचे होणारे हाल गावाला बघवत नव्हते.गावातील जाणत्या नागरिकांनी सांगितले की,नीलिमा मुलांना एकटे सोडते आणि सकाळपासून रात्रीपर्यंत पंचक्रोशीत फिरून भंगार जमा करते.ते धोकादायक स्थितीत घरातच ठेवते.मुलांची उपासमार असह्य झाली की,लोकांना काम , पैसे किंवा जेवण मागते.
कोणी समजून सांगायला गेले तर तिची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र असते.अखंड बोलणे,दगड मारणे अशा निलीमाच्या प्रतिक्रिया असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.पहिल्या दिवशी स्नेह मनोयात्री टीमने नीलिमाशी दीर्घ संवाद करून तिला काही काळासाठी मानसग्राम मध्ये चालण्याचा आग्रह केला. स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्रातील सुविधा आणि उपचारांची माहिती आणि छायाचित्र दाखविले. परंतु नीलिमाने दाद दिली नाही. 21 मार्च रोजी स्नेह मनोयात्री टीम पुन्हा गावात गेली आणि नीलिमाशी संवाद करून तिला पुनर्वसन प्रकल्पात मिळण्यासाठी राजी केले. दोन मुलांसह संस्थेत आलेल्या नीलिमाचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. मुलांना स्नेहालयाच्या दर्जेदार इंग्रजी माध्यम शाळेत प्रवेश मिळणार आहे.कालपासूनच त्यांच्या आरोग्यावर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले.
कृतज्ञता
सी एस आर डी या समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी स्नेह मनोयात्री टीमचे विशेष अभिनंदन केले. नीलिमाला स्नेह मनोयात्री केंद्रात दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार गोरक्ष शेजुळ यांनी विशेष मदत केली.याशिवाय पोलीस नाईक सुनील निकम,राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे,उंबरे येथील सरपंच सुरेश साबळे,डॉ.बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव ढोकणे,सुनील भाऊ अडसुरे ,(पंचायत समिती माजी सदस्य), विलास ढोकणे ,शिवसेना नेते दीपक वसंत पंडित,पोलीस पाटील श्री देवारे आदींनी या अभियानात सहयोग दिला.मानस ग्राम प्रकल्पाचे मानसोपचार तज्ञ डॉ.नीरज करंदीकर,क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट दीप्ती करंदीकर, प्रकल्पाचे समन्वयक रमाकांत दोड्डी,संचालक प्रवीण मुत्याल, परिचारिका सोनाली साळवे,सोशल वर्कर प्रेमलता खंदारे,सोशल वर्कर सोनु शहा, वाहनचालक गणेश धारेकर यांनी नीलिमाला संस्थेत दाखल करण्यासाठी परिश्रम घेतले.
मनोयात्री मिशन
स्नेहालय संचलित मानसग्राम हा स्नेहालय संस्थेचा मानसिक आरोग्यावरील बहुउद्देशीय सेवा प्रकल्प आहे.त्यातील स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्र 2020 पासून भारतातील रस्त्यांवर भटणाऱ्या बेवारस मनोरुग्णांचे उपचार आणि कौटुंबिक पुनर्वसन करते.श्रद्धा रिहाबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेचे डॉ. भरत वटवानी यांनी याकामी मार्गदर्शन दिले.गेल्या तीन वर्षात सुमारे 400 लाभार्थीना उपचार देऊन त्यांच्या परिवारात कौटुंबिक पुनर्वसन केले आहे.संस्थेला अशा लोकांची माहिती मिळाल्यास,त्यांना हक्काचा निवारा,जेवण, आरोग्यसेवा आणि मनोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची मदत मिळून ते बरे होतात आणि स्वतःच्या घरी पोहोचतात.गरीब आणि गरजू रुग्णांना त्यांच्या घरी पोहोचविल्यावर दोन वर्षे किंवा स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत मानसोपचाराची सर्व औषधे प्रकल्पाद्वारे मोफत दिली जातात. कुठलाही बेवारस मनोरुग्ण आढळला तर 9011011006 येथे संपर्काचे आवाहन प्रकल्पाने केले आहे.
आपला स्नेहांकित,रमाकांत दोड्डी,समन्वयक Mob-9011011006.