संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-महाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा आहे.संत विचारांचा वारसा वारकरी संप्रदायाला लाभला आहे.समजातील जातीभेद,धर्मभेद,स्त्री-पुरुष भेद अशा सर्व भेदभावांना दुर करण्यासाठी वारक-यांनी समाजात समतेची दिंडी काढावी असे आवाहन रिपब्ल्किन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
शिर्डी येथे अखिल भारतीय वारकरी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी वारकरी साहित्य संमेलनाचे आयोजक विठ्ठल पाटील,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट आणि राज्यभरातुन आलेले वारकरी संप्रदायाचे अनेक मान्यंवर उपस्थित होते.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे श्रीकांत भालेराव,विजय वाघचौरे,सुरेंद्र थोरात,सुनील साळवे,चांगदेव जगताप यांच्या सह अनेक मान्यंवर उपस्थित होते.संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत चोखामेळा असे अनेक संत महाराष्ट्राला लाभले आहेत. त्यांनी अनितीचा अंत केला,संत विचारांचा वारसा पुढे न्यावा, वारक-यांनी समाजातील भ्रष्ट होत चाललेली नितीमत्ता, अनैतिकतेचा अंत करावा. समाजात वाढत असणारे वासनाकंड,अनैतिकता याचा अंत झाला पाहिजे त्यासाठी संत विचारांची समाजाला गरज आहे.
वारकरी संप्रदायातील अनेक संस्कार आजही समजाला आदर्श आहेत.वारकरी संप्रदायाने नेहमी माणुसकी मानवतेला समतेला महत्व दिलेले आहे.त्यामुळे वारकरी संप्रदायाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा विचार पुढे घेवुन जाण्यासाठी समाजात समतेची दिंडी काढली पाहिजे.समतेचा विचारच आपल्या महाराष्ट्राला पुढे घेवुन जाणार आहे असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.