अहमदनगर प्रतिनिधी(दि.३१ जानेवारी):-तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत जंगुभाई तालीम जवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकुन जुगार खेळताना पाच जणांना रंगेहाथ पकडले.त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व दुचाकी असा 42 हजार 280 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोकॉ/ योगेश सातपुते यांनी फिर्याद दिली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप घोडके,संदीप पवार,मेघराज कोल्हे,शंकर चौधरी,योगेश सातपुते,यांचे पथक तोफखाना हद्दीत अवैध धंद्यावर कारवाईकामी गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार संदीप पवार यांना माहिती मिळाली की,जंगुभाई तालमीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू आहे. पोलीस अंमलदार संदीप पवार यांनी पोलीस निरीक्षक कटके यांच्या परवानगीने सदर ठिकाणी छापा मारून पाच जुगार खेळणाऱ्यांना पकडले, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तोफखाना पोलीस ठाण्याचे अंमलदार ज्ञानेश्वर मोरे यांनी कारवाई दरम्यान सहकार्य केले.