अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध व्यवसायिकांवर पोलिसांनी धडक कारवाई करत महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा पकडला आहे.श्रीगोंदा पोलिस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ८ लाख १३ हजार ९२७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे.पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी जिल्ह्यात अवैध तंबाखू आणि पानमसाला विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते.
आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले.या पथकात पोलीस अंमलदार गणेश लोंढे,सोमनाथ झांबरे,संतोष खैरे,बाळासाहेब नागरगोजे,शिवाजी ढाकणे, जालींदर माने,विशाल तनपुरे आणि किशोर शिरसाठ यांचा समावेश होता.दि.१५ एप्रिल रोजी पथकाने श्रीगोंदा पोलीस हद्दीत सापळा रचून संशयित वाहन (MH-16-CQ-8673) थांबवले. या वाहनातून दीपक नाना टकले (३१) आणि पंकज नाना टकले (२८) दोघेही रा. इंद्रप्रस्थ पार्क, काष्टी, ता. श्रीगोंदा यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून विमल, हिरा, आरएमडी कंपनीचा पानमसाला, विविध प्रकारची सुगंधित तंबाखू, मोबाईल फोन आणि सुझुकी इको कार असा एकूण ८,१३,९२७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान, आरोपी दीपक टकले याने सदरचा पानमसाला आणि तंबाखू भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील फरार अविनाश ढवळे आणि दौंड तालुक्यातील साळुमाळु पारगाव येथील फरार नौशाद सिद्दीकी व त्याचा कामगार मिराज हमीद शेख यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली.याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३७६/२०२५ नुसार भा.दं.वि. कलम १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.