अहिल्यानगर (दि.21 मे प्रतिनिधी):-जगभरात होत असलेले शहरीकरण आणि कुटुंबांचे विघटन यांचा प्रभाव भारतावरही पडला असून आपली पारंपारिक कुटुंब व्यवस्था कमकुवत होत आहे.कुटुंब हाच व्यक्ती विकासाचा पाया आणि भविष्य असल्याने कुटुंब व्यवस्था टिकवण्याचा संकल्प सर्वांनी करायला हवा, असे प्रतिपादन मिरॅकल फाउंडेशन इंडिया संस्थेचे प्रशिक्षण सहाय्यक संकेत शेगावकर यांनी केले.जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने 18 मे रोजी स्नेहालय संस्थेच्या कुटुंब आधारित सेवा प्रकल्पाच्या ( फॅमिली बेस्ड केअर) वतीने स्नेहालय पुनर्वसन संकुल MIDC येथे जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्यात आला.त्यास उद्घाटक म्हणून श्री.शेगावकर उपस्थित होते.संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त राजीव गुजर,संजय बंदिष्टी,संस्थेच्या सचिव डॉ.प्रीती भोम्बे,विश्वस्त सपना असावा, खजिनदार गीता कौर,इंग्लंड येथून अहिल्यानगर येथे स्थायिक होऊन गेली 11 वर्षे स्नेहालय संस्थेलाच आपले कुटुंब मानणारे ज्येष्ठ भारत सेवक निक कॉक्स, येथील विधी सेवा प्राधिकरणाच्या न्यायाधीश भाग्यश्री पाटील आणि स्नेहालय संस्थेतील विद्यार्थ्यांचे नातेवाईक,माजी विद्यार्थी अशांची या कार्यक्रमास उपस्थिती होती.स्नेहालय संस्थेतील मुले आणि त्यांचे पालक तसेच अनाथ मुलांचे दूरचे नातेवाईक यांच्या मधील प्रेमबंध दृढ करणारे अनेक उपक्रम यावेळी.दिवसभर आयोजित करण्यात आले होते.

“कुटुंबाचे महत्व ” या संकल्पनेवर आधारित विविध सांस्कृतिक, आणि सामाजिक उपक्रम, स्पर्धा यावेळी झाल्या.संस्थेचे कार्यकर्ते गिरीश कुलकर्णी म्हणाले की, “स्नेहालय संस्था हे एक कुटुंब आहे. संस्थेतील मुले व कर्मचारी हे सर्व एका कुटुंबां प्रमाणेच एकत्रित राहतात. मुल संस्थेमध्ये राहत असेल तरी त्याला हक्काच्या एका कुटुंबाची गरज असतेच.कुटुंबाचे प्रेम माया व जिव्हाळा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे.श्री.निक कॉक्स म्हणाले की,स्नेहालय संस्थेमध्ये राहत असताना मला भाऊ. काका,वडील,आजोबा अशी विविध नाती मिळाल्याने माझे जीवन आशयसंपन्न झाले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कुटुंबाच्या महत्वावर नृत्य-नाटिका,गीत यांचे सादरीकरण केले.पालक व मुले यांचे विविध खेळ घेण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयश्री देशपांडे यांनी केले.कार्यक्रमाच्या संयोजनात अनिल गावडे,हनिफ शेख, प्रविण मृत्याल,अशोक अकोलकर,समाधान धालगुडे, प्रकल्प समन्वयक सागर भिंगारदिवे,समुपदेशक प्रियंका कोंगळे,गायत्री इंगळे,शितल पिठाले,मंगेश घ्यार यांनी योगदान दिले.जळगाव जिल्ह्यातील धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संचालित मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवकही यात सहभागी झाले.
