संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):- संगमनेर शहरात घुलेवाडी येथील महात्मा फुले शाळा येथून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी (दि.२९ मे) रोजी मध्यरात्री १ वाजता गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना रात्र गस्तीवर असणाऱ्या शहर पोलिसांच्या पथकाने पकडले.या कारवाईत गावठी पिस्तुल व दोन मोबाईल असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोकॉ.रामकिशन मुकरे,अतुल उंडे,अजित कुहे,संतोष बाचकर, साईनाथ पवार यांचे पथक रात्र गस्तीवर असताना घुलेवाडीतील महात्मा फुले शाळेजवळ रस्त्यावर दोघे मध्यरात्री एक वाजता संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले.पथकाने त्यांची विचारपूस करत अंगझडती घेतली असता गावठी पिस्तुल व दोन मोबाईल मिळून आले.याप्रकरणी पोकॉ. रामकिशन मुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख मुज्जमील शेख मजिद (वय २२) व जमीरखान नजीरखान (वय ४०, दोघेही रा. ता. खामगाव, जि. बुलढाणा) यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
या कारवाईत ५० हजार रुपयांचे गावठी पिस्तुल व अकरा हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण ६१ हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी हे करत आहे.