आशा मोरे/कर्डक (नाशिक प्रतिनिधी):-पत्नीने पतीची कु-हाडीने निर्घृण हत्या करून मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खुंटविहिर जवळच्या मालगोंदा येथे उघडकीस आल्याने संपूर्ण नाशिक जिल्हा घटनेने हादरला आहे.यशवंत मोहन ठाकरे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पतीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला अटक केली आहे.तिने हत्या केल्याची कबुली दिली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने हत्येचे गूढ आणखी वाढले आहे.यशवंत १४ एप्रिल २०२५ पासून घरातून बेपत्ता होता. दोन महिने उलटूनही यशवंत घरी न परतल्याने आई – वडिलांनी पत्नी प्रभाकडे विचारणा केली असता यशवंत गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेल्याचे सांगितले.मात्र पाऊस पडून मुलगा घरी आला नाही त्यामुळं आई – वडिलांची चिंता आणखीनच वाढली.म्हणून त्यांनी पुन्हा प्रभाकडे विचारपूस केली असता तिने उडवा उडवीचे उत्तरे दिले.
प्रभा पतीला शोधण्याचे प्रयत्न करत नसल्याने यशवंतच्या कुटुंबियांना पत्नी प्रभाबद्दल संशय आला. त्यातच घराच्या ओसरी खड्डा करून शेणा मातीने सारवलेला दिसला.त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे सुने विषयी तक्रार दाखल केली.पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभा हिस तपासणी करीता सुरगाणा पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी पंचनामा करीत महसूल विभागाला समवेत घरातील ओसरीवरील खड्डा खोदकाम केले मात्र प्रेत आढळून आले नाही. प्रभाने या आरोपाचा इंकार करीत काही झालेच नाही अश्या अभिर्भावात वावरत होती.दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली असता.दारात पडलेल्या यशवंतची चप्पल पत्नी प्रभावाने मांडीखाली लपवून बसली होती.त्यामुळे तिला संशय आला.तिने ही बाब त्याच्या पती उत्तमला सांगितली. उत्तमने तपास घेतला असता मयत यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाचा शोषखड्डाजवळ कुजलेला वास येत होता तर माश्याही घोंगावत असल्याचे आढळून आल्याने त्याने खड्डातील माती उकरुन पहिली असता त्या ठिकाणी त्याला प्रेत असल्याचे आढळले.त्याने तातडीने पोलिसांना कळविले.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खड्ड्यातून यशवंतचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.पोलिसांनी तातडीने मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला असता आपणच कु-हाडीने वार करून हत्या केली व शरीराचे मान, धड, हातपाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून पुरून टाकले व वास येऊ नये म्हणून औषधे टाकल्याची कबुली तिने दिली.अधिक तपास पोलीस करीत आहेत.