सह्याद्री ऍग्रोवेट कंपनीच्या गोडाऊनला आग ६२ लाख रुपयांचे साहित्य पूर्णपणे जळून खाक
संगमनेर प्रतिनिधी (दि.५ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वेल्हाळे शिवारात सह्याद्री ऍग्रोवेट कंपनीच्या गोडाऊनला आग लागून ६२ लाख रुपयांचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना शनिवारी ता.४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे.परंतु आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा पंचनामा करण्यात आला.वेल्हाळे गावच्या शिवारात या कंपनीचे मोठे गोडाऊन आहे. यामध्ये कृषी क्षेत्राशी निगडित तसेच दुग्ध व्यवसायसंदर्भात मशिनरी व आवश्यक उत्पादनांची निर्मिती सह्याद्री ॲग्रोव्हेट कंपनीत होते.कंपनीचे संचालक,उद्योजक नितीन हासे यांनी उद्योजक अमित पंडित यांच्या मालकीची जागा त्यासाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे.तेथे कंपनी निर्मित होत असलेला माल ठेवला जात असे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि संगमनेर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आग इतरत्र पसरू नये, यासाठी अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले.परंतु तोपर्यंत सुमारे ६२ लाख रुपयांचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. गोडाऊनमध्ये १२६ टन विविध प्रकारचे रबर, इलेक्ट्रिक वायर,मोटार, ऑटोक्लेव्ह असा सुमारे ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल होता. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.