खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या चार तासातच जेरबंद.. आरोपी गोव्याला पळून जाण्याच्या होते तयारीत…मात्र नगर तालुका पोलिसांनी डाव उधळला..पाठलाग करत डोंगरातून घेतले ताब्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील तरुण बळीराम देविदास शिंदे याचा काही इसमांनी गुंडेगाव ते देऊळगाव सिद्धी रोडवर पाठलाग करुन धारधार चाकु आणि दांडक्याने मारहान करुन जिवे ठार मारुन पळुन जात असताना गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या चार तासात जेरबंद करण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आहे.
अधीक माहिती अशी की, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि श्री.प्रल्हाद गिते यांना बातमी मिळाली की,मयत नामे बळीराम देविदास शिंदे (वय.३० रा.गुंडेगाव ता.नगर जि. अहिल्यानगर) हा त्याचे चारचाकी वाहनाने गुंडेगाव वरुन देऊळगाव सिद्धी रोडकडे जात असताना आरोपी नामे १) डॅनियल येशुदास जावळे रा. तुकाई मळा,गुंडेगाव ता.नगर २) राहुल दिलीप राऊत रा. भैरवनाथ मंदिर मागे,गुंडेगाव ता. नगर ३)अमोल चंद्रकांत भुजबळ रा.माळवस्ती,वडगाव तांदळी ता. नगर असे मयताची गाडीला धडक देवुन तसेच रस्त्याचे खाली ढकलुन बळीराम शिंदे यास गाडीतुन बाहेर काढून धारधार चाकुन व दांडक्याने मारहाण करुन जिवे ठार मारले आहे. आणि अपघाताचा बनाव करुन गोव्याला जातो असे म्हणुन पळुन गेले.त्यावर सपोनि श्री. प्रल्हाद गिते यांनी तपास पथकातील पोहेकॉ.सुभाष थोरात,पोहेकॉ.रविकिरण सोनटक्के,पोहेकॉ.बाबा खेडकर व पोकॉ.सागर मिसाळ यांना आरोपीचा शोध घेणेकामी तात्काळ रवाना केले.तपास पथकातील अंमलदार यांनी आरोपींबाबत गोपनीय माहिती घेत तसेच तांत्रिक विश्लेषन करुन आरोपी हे गोव्याला पळुन जाणार आहेत अशी माहिती अवगत केली.
त्यावर तपास पथक तात्काळ रवाना होत सुपा ते शहाजापुर रोड वर एका ठिकाणी डोंगरात एक चार चाकी वाहन संशयीत रित्या उभे असल्याचे दिसले.पथकातील अंमलदार यांना खात्री होताच वाहनाजवळ जात असताना आरोपींना चाहुल लागली आणि ते पळू लागले.यातील तीनही आरोपी डोंगर भागातुन वेगवेगळ्या दिशेने पळून जात असताना पथकातील अंमलदार यांनी जिवाची बाजी लावत आरोपींचा सिनेस्टाईलने पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यातील आरोपी डॅनियल येशुदास जावळे हा एका गवताच्या पांदीमध्ये लपुन बसला होता.त्यास सापडण्यात देखील पथकाला यश आले आहे.तसेच सदर आरोपी यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सपोनि.प्रल्हाद गिते हे करीत आहेत.सदरची कामगिरी श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या सूचनेनुसार श्री.प्रल्हाद गिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक,नगर तालुका पोलीस स्टेशन,तपास पथकातील पोहेकॉ.सुभाष थोरात,पोहेकॉ.रविकिरण सोनटक्के,पोहेकॉ.बाबा खेडकर व पोकॉ.सागर मिसाळ तसेच पोकॉ.नितीन शिंदे,मोबाईल सेल विभाग यांनी केली आहे.