प्रवरा नदीपात्रात विशेष पोलीस पथकाचा सापळा..जेसीबी,वाळू भरलेला ट्रॅक्टर,डंपर हायवा जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोली (ता.राहुरी) येथे प्रवरा नदीपात्रातून अवैधपणे वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत २८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (अहिल्यानगर) यांच्या आदेशानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
२३ जून २०२५ रोजी गुप्त माहितीच्या आधारे चिंचोली परिसरात छापा टाकण्यात आला. त्यावेळी अवैध वाळू उपसा करत ट्रॅक्टर व ट्रॉलीद्वारे वाळू वाहतूक करणारे काही इसम आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी वाहनांसह पळून गेले. मात्र,पथकाने पाठलाग करून ३ आरोपींना ताब्यात घेतले.कारवाईत एक स्वराज कंपनीचा यारी ट्रॅक्टर, ट्रॉलीसह वाळू भरलेला ट्रॅक्टर,टाटा डंपर, हायवा,जेसीबी तसेच १८ ब्रास वाळू असा एकूण २८ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत, एकलव्य वसाहत राहुरी येथे एका महिला तिच्या राहत्या घरात गावठी हातभट्टीची दारू साठवून विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने छापा टाकून दारू जप्त केली असून सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे व वैभव कलुबमें, आणि डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकातील पोसई/राजेंद्र वाघ, सफौ शकील शेख, पोहेकों/शंकर चौधरी, पोहेकों अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ अजय साठे, पोहेकों दिगंबर कारखिले, पोहेकों/मल्लिकार्जुन बनकर पोहेकों/दिनेश मोरे, पोहेकॉ उमेश खेडकर, पोकों/सुनिल दिघे, पोकों/अमोल कांबळे, पोकों/जालिंदर दहिफळे यांनी केली आहे.