शहरात चोरी प्रकरणाचा 24 तासाच्या आत यशस्वी तपास.. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार…
अहिल्यानगर (प्रतिनिधी)– शहरातील चितळे रोड,कापड बाजार, सर्जेपुरा व शहराच्या विविध परिसरात एकाच रात्रीत झालेल्या चोऱ्यांनी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडलेल्या या चोरीत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते, तरीही या गंभीर घटनेने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. या पार्श्वभूमीवर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन तातडीने तपास करण्याची मागणी केली होती. तसेच वेळेत कारवाई न झाल्यास व्यापाऱ्यांसह आंदोलन छेडण्याचा इशाराही आमदारांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर केवळ २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीचा छडा लावत पुणे विमानतळावरून तीन आरोपींना अटक केली.
या यशस्वी कारवाईनंतर आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, शहर उपविभागीय अधिकारी अमोल भारती, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि तपासात सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, “जशी चूक झाल्यावर पोलिसांवर टीका होते, तशी त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन कौतुक करणे समाजाचे कर्तव्य आहे. पोलिसांनी अत्यंत तत्परतेने काम करत चोरट्यांना जेरबंद केले, त्यामुळे शहरात आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे.सत्कार समारंभास व्यापारी प्रतिनिधी रमेश दुल्लम, दीपक नवलानी, सुरेश बनसोडे,अशोक गायकवाड, अँड.राजेश कातोरे, बाली बांगरे, अंकुश मोहिते आदी उपस्थित होते.