लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोन्ही पूर्णाकृती पुतळ्यांबाबत १० ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन…
नगर (प्रतिनिधी)- आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या उभारणी संदर्भात प्रस्तावावर सखोल चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक येत्या १० ऑगस्ट २०२५ रोजी, सकाळी ३.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सिद्धार्थ नगर येथील साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे चौकाजवळील महाराष्ट्र बालक मंदिर शाळेत होणार आहे. या बैठकीत सकल मातंग समाज, विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच लहू सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, लहुजी वस्ताद साळवे व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या सन्मानार्थ शहरात पूर्णाकृती पुतळ्यांची उभारणी कशी करता येईल, यावर व्यापक चर्चा होणार आहे.
बैठकीनंतर “पूर्णाकृती पुतळा समिती” स्थापन करण्यात येणार असून, ही समिती पुढील नियोजन, शासकीय परवानग्या, निधी संकलन, जागा निश्चिती, व मूर्तीकार निवड यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर काम करणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमात सर्व समाजबांधवांनी सक्रिय सहभाग घ्यावा, आपल्या उपस्थिती व मार्गदर्शनाने या उपक्रमास बळ द्यावे, असे आवाहन सकल मातंग समाजाने केले आहे.