‘आपने कुछ देर पहिले मेरी गाडी क्यों रोकी और ड्रायव्हर को मारा’ म्हणत मोटार वाहन निरीक्षकास धमकी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-वाहन तपासणी दरम्यान कारवाई केल्याचा राग मनात धरून मोटारवाहन निरीक्षक गीता भास्कर शेजवळ यांना मोबाईलवरून धमकी दिल्या प्रकरणी आश्मी रोडलाईसच्या प्यारे खान विरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मोटार वाहन निरीक्षक शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,१२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.१७ वाजता अहिल्यानगर ते पुणे महामार्गावर चास शिवारात शेजवळ या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सूरज उबाळे व चालक भीमराव जगताप यांच्यासह वाहन तपासणी करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप व्हॉइस कॉल आला. फोन उचलल्यावर समोरील व्यक्तीने स्वतःचे नाव “आश्मी रोडलाईसचे तथा अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान” असल्याचे सांगितले.
त्याने हिंदीत एकेरी भाषेत बोलत, “आपने कुछ देर पहिले मेरी गाडी क्यों रोकी और ड्रायव्हर को मारा? मैं अल्पसंख्यांक आयोग का दर्जे का अध्यक्ष हूं, तुम्हें घर पर बुला सकता हूं. एनएचआय का टोल नाका चलाने के लिये लिया है, उधर शासकीय गाडी कैसे खडी करते हो, यह देखता हूं. तुम्हें आयोग के आगे खडा करता हूं” अशा शब्दांत धमकी दिली. या घटनेनंतर चौकशी केली असता, संबंधित व्यक्तीच्या वाहन क्रमांक MH-40 CD-5429 वर यापूर्वीही ओव्हरलोडिंगसाठी ई-चलनाद्वारे दंड आकारण्यात आलेला असल्याचे समोर आले. या दंडाच्या रागातूनच शेजवळ यांना फोन करून धमकी दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे शासकीय कर्तव्य बजावताना संबंधित व्यक्तीकडून जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवून नगर तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
