पेरियार यांच्या विचाराकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष..धर्म आणि विश्वदृष्टी पेरियार यांच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रकाशित
मुंबई (प्रतिनिधी):-पेरियार ई.व्ही.रामस्वामी यांच्या विचारांना मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे महत्त्वाचे पुस्तक ‘धर्म आणि विश्वदृष्टी’ नुकतेच प्रकाशित झाले आहे. या मधुश्री पब्लिकेशनच्या या मराठी पुस्तकाचा अनुवाद डॉ. सागर भालेराव यांनी केला असून, प्रकाशन सोहळा वरळी, मुंबईत झाला.या कार्यक्रमाला माजी विधानपरिषद सदस्य कपिल पाटील,राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा कांदळकर, उद्योजिका निलिमा गाडे, डॉ. कैलास गौड, मारुती शेरकर आणि प्रियांका खरवार उपस्थित होते.
कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “महाराष्ट्राने भाषिक अडचण आणि सोयीच्या राजकारणामुळे पेरियारांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले. इतिहास समजून घेताना आपल्या नायकांनी काय विचार मांडले, कोणते प्रश्न उपस्थित केले हे पाहणे आवश्यक आहे. पेरियारांच्या राष्ट्रवादाच्या मागणीला आजच्या काळात आपण समजून घेतले पाहिजे. विवेकवादी राष्ट्रवाद मांडण्याचा त्यांचा प्रयत्न होता, आणि हीच त्यांची खरी ताकद होती.”
राजा कांदळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पेरियारांनी धर्म आणि संस्कृती या विषयावर महत्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांच्या विचारांना मराठी साहित्यात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अनुवादक डॉ. सागर भालेराव यांनी केले असून, याबद्दल आम्ही त्यांचे तसेच मधुश्री पब्लिकेशनचे मनःपूर्वक आभारी आहोत.”कार्यक्रमात डॉ. भालेराव यांनी पुस्तकातील प्रमुख विचारांवर सखोल मांडणी केली. त्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात श्रोत्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे पेरियार यांना केवळ ‘नास्तिक’ म्हणणे किती अपुरे आहे हे अधोरेखित करणे. धर्म, देव आणि मानवी समाजाचे भविष्य याबाबत त्यांनी मांडलेले विचार त्यांच्या सामाजिक व तात्त्विक दृष्टिकोनाची खोली दाखवतात.
ग्रंथ दोन भागांत विभागलेला आहे
पहिला भाग पेरियार यांची धर्म व देव यावरील मूळ लिखाणावर आधारित आहे. तर, दुसरा भाग पेरियार यांचे तत्त्वज्ञान, प्रस्थापित साहित्यावरचे विचार आणि भविष्यातील जगाविषयीची त्यांची भूमिका यावर आधारित आहे.पेरियार लिखित ‘सच्ची रामायण’ या पुस्तकाचा डॉ. भालेराव यांनी याआधी अनुवाद केला आहे. तसेच आता प्रकाशित झालेल्या ‘धर्म आणि विश्वदृष्टी’ या पुस्तकात धर्म, जात आणि सामाजिक अन्यायाविरुद्धचा त्यांचा भीषण संघर्ष दर्शवला आहे. डॉ. भालेराव यांच्या या अनुवादामुळे मराठी वाचकांना पेरियारांचा बिनधास्त दृष्टिकोन नव्याने समजून घेण्याची संधी मिळणार आहे.आजच्या काळातही पेरियारांचे विचार सामाजिक न्याय, समानता आणि विवेकवाद या मूल्यांची पुनर्स्मृती करून देतात. त्यामुळे त्यांचे लेखन केवळ इतिहास नाही, तर वर्तमान आणि भविष्य घडविण्याचे साधन आहे, असे मत पुस्तकाचे लेखक-अनुवादक डॉ. सागर भालेराव यांनी व्यक्त केले.