हिवरगाव पावसा येथील मागासवर्गीय शेतकरी संपत शिंदे यांच्या दीड लाखांच्या बोकडांची चोरी..परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस गस्त पथकाची मागणी..गावकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-हिवरगाव पावसा येथील संपत भीमाजी शिंदे यांच्या शेड मधील १४ बोकडांची चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केली.पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास चोरटे आल्याचे चित्रण येथील चौकात ग्रामपंचायतीने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झाले आहे.बोकड चोरीमुळे मागासवर्गीय शेतकरी संपत भिमाजी शिंदे यांचे दीड लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.महामार्गालगत असलेल्या हिवरगाव पावसा व परिसरात मोटर सायकल चोऱ्या,दुकानांच्या चोऱ्या,बोकड चोरीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हिवरगाव पावसा टोल नाका परिसर संवेदनशील बनलेला आहे.त्यामुळे परिसरात पोलिसांच्या रात्रीच्या गस्त पथकाची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
हिवरगाव पावसा देवगड जवळ संपत भीमाजी शिंदे (५५) हे पशुपालक शेतकरी उदरनिर्वासाठी शेळी पालनाचा जोडव्यवसाय व्यवसाय करतात.त्यांच्या शेडमधून शनिवार पहाटे तीन वाजता शेडचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे किंमत लहान-मोठे १४ बोकडांची चोरी केली.संपत शिंदे कुटुंबासमवेत मध्यरात्री झोपेत असताना त्यांना शेळ्यांचा आवाज आला.रस्त्यालगत पांढऱ्या रंगाची पिकअप उभी असल्याचे दिसून आले.परंतु लघुशंकेसाठी थांबले असेल म्हणून त्या गाडीकडे दुर्लक्ष केले.परंतु कुलूप तोडल्यामुळे शेड मधील शेळ्या सैरभैर बाहेर बाहेर पळू लागल्या.सैरभैर झालेल्या शेळ्यांना शेडमध्ये घेण्यात व्यस्त झालेल्या संपत शिंदेंना पाहून पिकअप व दहा ते बारा चोरटे फरार झाले.चोरट्यांनी भरधाव वेगाने हिवरगाव पावसा गावाच्या दिशेने पिकअप पळवली.इतर बाकीचे चोरटे मोटरसायकल वरून पसार झाले.संपत शिंदे एकटेच असल्यामुळे त्यांना आरडाओरड देखील करता आली नाही.त्याच प्रमाणे वस्ती जवळ नसल्यामुळे याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या शेळ्या आणि बोकडावर डल्ला मारला.याबाबत संपत शिंदे यांनी घुलेवाडी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.साधारण पाच ते सहा महिन्याचे व काही दहा ते अकरा महिन्याचे शेळी बोकड होते.
त्यांचे या घटनेत एक लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.तसेच परिसरात खांडगाव येथेही अशा घटना घडल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.रात्रीची पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी गावकर्यांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.