कापड बाजार येथील आदर्श व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने पीएसआय राजेंद्र वाघ यांचा सत्कार..३४ वर्षांची उल्लेखनीय सेवा,राष्ट्रपती पदकाचा मान, नागरिकांचा विश्वास संपादन करणारे पीएसआय राजेंद्र वाघ
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कापड बाजार येथील आदर्श व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून त्यांचा सन्मान करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर पोलीस दलात तब्बल 34 वर्षे उत्कृष्ट सेवा करून राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल पीएसआय राजेंद्र वाघ यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मर्चंट बँकेचे माजी चेअरमन अण्णा शेठ मुनोत, संचालक विजय कोथिंबीर, धीरज लड्डा, निखिल गांधी यांचादेखील सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मंडळाचे संस्थापक संजय चोपडा, अध्यक्ष राजेंद्र तातेड, राजेंद्र गांधी, बाबासाहेब गोरे, अजय गुगळे, बापू गांधी, अशोक कर्णावट, हेमंत जोशी, किरण पोखरणा, संतोष भळगट आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना पीएसआय राजेंद्र वाघ म्हणाले की, “पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावत असताना सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून न्याय देण्याचा प्रयत्न केला. खऱ्या गुन्हेगारांना शोधून जेरबंद केले. नागरिकांशी थेट संवाद व संपर्क ठेवल्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत झाली. नागरिकांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करू शकलो. आदर्श व्यापारी मित्र मंडळाने केलेल्या या सन्मानाबद्दल मी ऋणी आहे.यावेळी संस्थापक संजय चोपडा म्हणाले की, “महावीर चषक परिवाराने नेहमीच समाजामध्ये चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा जपली आहे. पीएसआय राजेंद्र वाघ यांनी केलेल्या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहत असून, त्यांच्या फोनवर संपर्क साधल्यावर नागरिकांना संरक्षणाची हमी मिळत असल्याचा विश्वास आहे.
