गणेश उत्सवानिमित्त देवगड विद्यालयात किशोरवयीन आरोग्य संवाद..डॉ.प्रमोदिनी सानप यांचे मुलींना आरोग्य मार्गदर्शन
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):- संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयात गणेशोत्सवा निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि आरोग्य जनजागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या विशेष व्याख्यानासाठी प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ.प्रमोदिनी अमोल सानप प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी किशोरवय हा जीवनातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.या काळात मुलींना शारीरिक आणि मानसिक स्वरूपाचे अनेक बदल अनुभवायला येतात.या बदलांना योग्य प्रकारे सामोरे गेल्यास मुली आत्मविश्वासाने शिक्षण आणि आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत यशस्वी होऊ शकतात,असे डॉ.सानप म्हणाल्या.
डॉ.सानप यांनी मुलींना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना मासिक पाळीच्या काळातील योग्य काळजी,स्वच्छ साधनांचा वापर,पोषणयुक्त आहार आणि पाणी पिण्याच्या सवयींबाबत माहिती दिली.ग्रामीण भागात अजूनही या विषयावर अज्ञान व गैरसमज असल्यामुळे मुलींमध्ये आरोग्य समस्या वाढतात.या संदर्भात योग्य माहिती मिळणे आवश्यक असल्याचे सांगीतले.तसेच,मुलींनी योग्य आहार व व्यायामाची सवय लावून घेतली पाहिजे,असे सांगताना त्यांनी अतिरेकी जंकफूड टाळावे, फळे-भाज्या,दूध व प्रथिनयुक्त पदार्थ खावेत,असे सांगितले. शारीरिक हालचाली कमी झाल्यास लठ्ठपणा,हार्मोनल बिघाड यांसारख्या समस्या निर्माण होतात.यासाठी दररोज किमान अर्धा तास चालणे, खेळणे,योगासने करणे आवश्यक आहे.
डॉ.सानप यांनी मुलींना मानसिक आरोग्याचे महत्त्व देखील पटवून दिले.स्पर्धा,अभ्यासाचा ताण, सामाजिक दबाव या सर्वामुळे तणाव वाढतो.अशा वेळी मुलींनी पालकांशी,शिक्षकांशी किंवा डॉक्टरांशी मोकळेपणाने संवाद साधावा.ताण मनात ठेवून दडपणाखाली राहिल्यास भविष्यात गंभीर समस्या उद्भवू शकतात,असे त्या म्हणाल्या.व्याख्यानादरम्यान मुलींनी विविध प्रश्न विचारले.“मासिक पाळीतील समस्या”,“वाढीच्या वयात होणारे बदल”,“त्वचेच्या समस्या”, “आहारातील गोंधळ” या विषयांवर डॉ.सानप यांनी शंकांचे निरसन केले.मुलींनीही व्याख्यानाचा मनापासून लाभ घेतला.मुख्याध्यापिका श्रीम.सुनंदा उगले आपल्या भाषणात डॉ.सानप यांच्या व्याख्यानातून मुलींमध्ये आरोग्यविषयक सजगता वाढून त्यांना आत्मविश्वासाने आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळेल,डॉ.सानप कार्याचे कौतुक करताना ग्रामीण भागातील मुलींना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रमोदिनी अमोल सानप यांचा शाळेच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापिका सुनंदा उगले,सविता वर्पे आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
