अहिल्यानगर आरटीओत मोटार वाहन निरीक्षक लाच प्रकरणी अडकल्या
अहिल्यानगर प्रतिनिधी:-अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि त्यांच्यासोबत असलेला खाजगी इसम इस्माईल पठाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.

माहितीनुसार, तक्रारदार (वय ६५ वर्षे) यांनी मौजे पाटस येथून ओव्हरलोड सिमेंटची गाडी चालवण्यासाठी आरटीओ कार्यालयात २२ सप्टेंबर रोजी भेट दिली असता, निरीक्षक गीता शेजवळ व खाजगी इस्माईल पठाण यांनी वाहन त्यांच्या हद्दीतून चालू देण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २४ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, आरोपींनी तडजोडीअंती ३ हजार रुपयांची मागणी मान्य केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी चांदणी चौक, आरटीओ कार्यालयाजवळ सापळा रचण्यात आला. इस्माईल पठाण यांनी तक्रारदाराकडून शासकीय पंचासमक्ष ३ हजार रुपये स्वीकारताच त्यांना पथकाने ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान पठाणकडून ५०० रुपये रोकड आणि जिओ कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, पुढील तपासासाठी मोबाईलचे विश्लेषण केले जाणार आहे. तसेच निरीक्षक गीता शेजवळ यांच्या घरझडतीची कारवाई सुरू असून, त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईत उपअधीक्षक राजीव तळेकर, पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही मोहिम राबवली.
लाचलुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामकाजात कुणीही अधिकारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ संपर्क साधावा.
तक्रारीसाठी संपर्क क्रमांक:टोल फ्री क्र.: 1064,,व्हॉट्सॲप क्र.: 7720891064
