खासदार नीलेश लंके यांचा चार दिवसांचा अल्टीमेटम…छ.संभाजीनगर रस्त्यासाठी रस्ता रोकोचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर या राज्यातील महत्वाच्या महामार्गावर वडाळा, ता. नेवासा परिसरापासून सलग मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था मृत्यूच्या सापळयाप्रमाणे झाली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी यापूर्वी पत्र देऊनही कारवाई झाल्याने येत्या चार दिवसांत दुरूस्ती न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे.अधीक्षक अभियंत्यांच्या भेटीप्रसंगी खा. लंके यांच्यासमवेत नगरसेवक योगीराज गाडे, रामेश्वर निमसे, सचिन डफळ, दादा जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

रस्त्याच्या दुरूस्तीसाठी खा. लंके यांनी दि.२१ ऑगस्ट २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागास लेखी पत्र दिले होते. मात्र तब्बल महिनाभरानंतरही कोणतीही हालचाल झालेली नाही. दररोज जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करत आहे. पण बांधकाम विभाग मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप करत खा. लंके यांनी अधीक्षक अभियंत्यांची भेट घेत संताप व्यक्त केला. खा.लंके यांनी बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना गुरुवारी पत्र देत विविध मागण्या केल्या आहेत. रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्यात येऊन तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, रूंदीकरणासह दीर्घकालीन योजना जाहिर करून कायमस्वरूपी दुरूस्ती करण्यात यावी, अपघात टाळण्यासाठी महामार्गावर आवष्यक सुचना फलक तसेच सिग्नलची सोय करण्यात यावी. या मागण्यांचा पत्रात समावेश आहे. लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार निवेदन देऊनही निष्क्रियता सुरूच असल्याबाबत संताप व्यक्त करत पुढील चार दिवसांत ठोस पावले उचलली नाहीत तर आपण स्वतः नागरिकांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा खा. लंके यांनी या पत्रात दिला आहे.
नागरिकांच्या संतापाचा उद्रेक
स्थानिक ग्रामपंचायती, पत्रकार आणि नागरिक सतत या विषयावर आवाज उठवत आहेत. अपघातांची भीषण मालिका आणि वाहतुकीतील अडथळयांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने त्वरीत काम सुरू केले नाही तर जनआक्रोश उफाळेल अशी प्रतिक्रीया ग्रामस्थांमधून व्यक्त होत असल्याचे खा. लंके यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
जीवितहानीपूर्वी जागे व्हा !
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा महामार्ग आहे. दररोज हजारो प्रवासी आणि मालवाहतूक करणारी वाहने याच मार्गावरून जातात. खड्ड्यांमुळे रस्त्यावर पाणी साचून धोक्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, तातडीने दुरूस्ती करा, नाहीतर रस्ता ठप्प करू. हा इशारा केवळ निवेदनापुरता मर्यादित नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततसेसाठी उचललेले निर्णायक पाऊल आहे, असा संदेश खा. नीलेश लंके यांनी दिला आहे. अहिल्यानगर-संभाजीनगर रस्त्याच्या तातडीच्या दुरूस्तीच्या मागणीचे पत्र खा. नीलेश लंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देत रस्ता रोकोचा इशाराही दिला.