कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद.. 3.59 लाखांचा मुद्देमाल हस्तगत..स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यात व्यापाऱ्यांच्या दुकानांमधून कॉपर वायर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली असून या कारवाईत एकूण 08 गुन्हे उघडकीस आले आहेत.आरोपींकडून ₹3,59,500/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
📌 घटना
15 सप्टेंबर 2025 रोजी राशिन (ता. कर्जत) येथे शिवम मशिनरी अॅण्ड स्टुल्स या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी ₹64,000/- किमतीचे कॉपर वायर लंपास केले होते. याबाबत कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
📌 कारवाई
जिल्ह्यातील कॉपर चोरीच्या वारंवार घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोनि श्री.किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे,फुरकान शेख,शामसुंदर जाधव,मनोज साखरे,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,प्रशांत राठोड,आकाश काळे,बाळासाहेब खेडकर महादेव भांड,अरुण मोरे,महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत आदींच्या पथकाने सलग आठ दिवस तपास करून संशयितांची माहिती मिळवली.या तपासात महादेव रंगनाथ पवार (48, अकलुज, सोलापुर) व दादा लाला काळे (19, सवतगाव, सोलापुर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपल्या इतर साथीदारांसह (एकूण ७ आरोपी) कॉपर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीजबाबावरून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
📌 उघडकीस आलेले गुन्हे
अहिल्यानगर व सोलापुर जिल्ह्यातील एकूण 08 गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग निष्पन्न झाला आहे. याशिवाय मुख्य आरोपी महादेव पवार याच्यावर सोलापुर,धाराशिव, सातारा,पुणे व रायगड जिल्ह्यातील तब्बल 13 जुने गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
📌 पुढील तपास
ताब्यातील आरोपींना कर्जत पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
👉 ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
