वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश…जिल्हाधिकाऱ्यांकनी दिले हे महत्वाचे आदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून “सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजना” आता महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. शासनाच्या महसूल व वन विभागाने 1 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार गावांतर्गत किंवा वापरात नसलेले पांदन रस्ते, भविष्यात न लागणारी सार्वजनिक जमीन तसेच रस्त्यांच्या सीमेमध्ये असलेली अतिक्रमित घरकुलं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 21 नुसार नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयाची जिल्हास्तरावर त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व तालुक्यांचे तहसीलदार यांना शासन निर्णय क्र. जमीन-2025/प्र.क्र.236/ज-1 याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “पांदन रस्ते, अतिक्रमित घरकुलं व गावांतर्गत रस्ते नियमित करण्याबाबत शासनाने दिलेल्या निर्णयामुळे घरकुल धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र या प्रक्रियेत कोणाची अडवणूक होत असेल तर संबंधितांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना थेट संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.”