ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद ६ आरोपी ताब्यात..४.२३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात LCB च्या पथकाला यश
अहिल्यानगर (दि.२ ऑक्टोबर २०२५):- अहिल्यानगर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत विद्युत वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद केली आहे.या कारवाईत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून एकूण ₹४,२३,८००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
घटना अशी घडली
दि.२२ सप्टेंबर २०२५ रोजी फिर्यादी श्री. दिपक महादेव शिंदे, रा. शिंदे (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे गावच्या शिवारातील तुकाई चारी लिफ्ट इरिगेशन सब स्टेशन येथे हायराझर कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे ₹२५,७२,४००/- किमतीचे कॉपर कोर व ऑईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५२२/२०२५ भा.द.वि. कलम ३०३(२), ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी मश्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस विशेष तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोनि श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि समीर अभंग, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, बाळासाहेब खेडकर, अरुण मोरे तसेच महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.गुप्त माहितीच्या आधारे पथकाने संशयित आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवली असता आरोपी मच्छिंद्र रामदास काळे (रा. नवसरवाडी, ता. कर्जत) हा आपल्या साथीदारांसह घरी असल्याची माहिती मिळाली. पथकाने छापा टाकून त्याला व इतरांना ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपींची नावे
१. मच्छिंद्र रामदास काळे (वय ५०, रा. नवसरवाडी, कर्जत)
२. सागर मच्छिंद्र काळे (वय १९, रा. नवसरवाडी, कर्जत)
३. श्याम विष्णु पवार (वय २६, रा. नवसरवाडी, कर्जत)
४. विष्णु सरदार पवार (वय ६५, रा. नवसरवाडी, कर्जत)
५. किशोर खेलु पवार (वय ४५, रा. मार्डी, जि. सोलापुर)
६. राजकुमार मधुकर भोपळे (रा. ढोकी, जि. धाराशिव)
तर आरोपी सचिन विष्णु पवार, शिवाजी विष्णु पवार, प्रविण उर्फ पवन पवार हे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
मुद्देमाल जप्ती
सदर आरोपींकडून ₹४,२३,८००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच फरार आरोपींपैकी एकाकडून गुन्ह्यात वापरलेले वाहनही पोलिसांच्या हाती लागले आहे.
आरोपींचा पूर्वइतिहास
आरोपी किशोर खेलु पवार हा रेकॉर्डवरील आरोपी असून सोलापुर व धाराशिव जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या एकूण १३ गुन्ह्यांमध्ये तो यापूर्वी अडकलेला आहे.
पुढील तपास
सर्व ताब्यातील आरोपींना कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई श्री. सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्ष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.