पूरग्रस्तांसाठी प्रार्थना व मदतीचे आवाहन.. फिलादेल्फीया चर्चचा पुढाकार पूरग्रस्तांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे,हीच खरी मानवतेची सेवा- रेव्ह.दीपक दुसाने
पुणे (प्रतिनिधी):-सध्या महाराष्ट्रभर पावसाने जोर धरला असून नद्या,ओढे,नाले तुडुंब भरून वाहत आहेत.या भीषण परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन,कांदा,ऊस तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. सणासुदीच्या दिवसांत हातात निराशा पसरली असून शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर फिलादेल्फीया चर्च पुणे येथे रेव्ह. दीपक दुसाने यांनी विशेष प्रार्थना केली. त्यांनी म्हटले की,”पूरग्रस्त भागातील सर्व लोकांना या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीबद्दल खूप वाईट वाटत आहे.देव त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलो, हीच आमची प्रार्थना.”रेव्ह. दुसाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की,या संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी.प्रार्थनेचा मुख्य उद्देश पूरग्रस्तांना मानसिक व आध्यात्मिक आधार देणे तसेच संकटाचा सामना करण्याची धैर्य व शक्ती मिळावी हा होता.पूरग्रस्तांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, हीच खरी मानवतेची सेवा असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.