आरटीआय कार्यकर्त्याने डॉक्टरला दिल्या धमक्या;२२ हजार रुपये उकळले
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आरटीआय कार्यकर्ता असल्याचे सांगत एका तथाकथित कार्यकर्त्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला “जेलमध्ये बसवतो,भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करतो,रिट पिटीशन दाखल करतो” अशा धमक्या देत पैशांची उकळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार,डॉ. रामदास बोरुडे (वय 40, रा. बेलापूर रोड,श्रीरामपूर) हे टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत.
दरम्यान,एजाज पठाण (वय 27, रा.बोरावके कॉलेजच्या पाठीमागे, वॉर्ड नं.01,श्रीरामपूर) याने स्वत:ला आरटीआय कार्यकर्ता व छावा ब्रिगेड संघटनेचा जिल्हा संपर्कप्रमुख असल्याचे सांगून डॉ. बोरुडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज करतो,भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करतो व तुला जेलमध्ये बसवतो अशा प्रकारे धमकावले.सुरुवातीला त्याने 30 हजार रुपयांची खंडणी मागणी केली.त्यापैकी तब्बल 22 हजार रुपये गुगल-पे द्वारे स्वीकारले. मात्र त्यानंतर आरोपीची लालसा वाढली आणि त्याने पुढे एक ते दोन लाख रुपयांची मागणी करीत डॉक्टरला वारंवार धमकावणे सुरू केले.डॉ.बोरुडे यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.या प्रकरणी आरोपी एजाज पठाण याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून,पोलीस निरीक्षक श्री.धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.डौले पुढील तपास करत आहेत.