कत्तलीसाठी आणलेली ४ गोवंशीय जनावरे स्थानिक गुन्हे शाखेकडून मुक्त;६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर, दि. ४ ऑक्टोबर (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत ४ जिवंत गोवंशीय जनावरे कत्तलीपासून वाचवली. या कारवाईत सुमारे ₹६,६०,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत पोनि श्री.किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरीष भोये, पोउपनि दिपक मेढे, तसेच पोलीस अंमलदार दिपक घाटकर, शामसुंदर गुजर, बिरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, राहुल डोके, विशाल तनपुरे, महादेव भांड आदींचे पथक तयार करण्यात आले होते.दि.४ ऑक्टोबर रोजी सोनई पोलीस ठाणे हद्दीत पथक गुप्त माहिती घेत असताना, असिफ अतिक शेख (२८, रा. चांदा, ता. नेवासा) व अविनाश मोहन बराटे (३७, रा. बराटे वस्ती, घोडेगाव, ता. नेवासा) हे दोघे जिवंत गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणत असल्याची माहिती मिळाली.यानुसार बराटे वस्ती, घोडेगाव येथे पथकाने छापा टाकला असता, दोन्ही आरोपी पिकअप वाहनातून जनावरे खाली उतरवत असल्याचे दिसून आले. तत्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्या जवळून ₹१,६०,०००/- किमतीची ४ जिवंत गोवंशीय जनावरे व ₹५,००,०००/- किमतीचे पिकअप वाहन (क्र. MH-17 BD-0112) असा मिळून ₹६,६०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना.सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७१/२०२५, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(ब), ९(ब), तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याबाबतचे कलम ३ व ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.