अहिल्यानगर (दि.४ ऑक्टोबर २०२५):- सरकारी अनुदान व मोठ्या कंपन्यांचे CSR निधी अनिश्चित असल्याने शाश्वत सामाजिक विकास फक्त स्वावलंबी संस्थांकडूनच शक्य असल्याचे प्रतिपादन कल्याणी टेक्नोफोर्जचे व्यवस्थापकीय संचालक रवी नगरकर यांनी केले.
स्नेहालय संस्थेच्या हिम्मतग्राम (ता. इसळक, जिल्हा अहिल्यानगर) येथे उभारलेल्या संरक्षित शेती प्रकल्पाचे उदघाटन नगरकर यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पात अर्धा एकर जागेवर सुसज्ज पॉलिहाऊस, तर तीन एकर क्षेत्रावर सेंद्रिय फळे व भाज्यांची लागवड करण्यात आली आहे.
१५०० जणांना जगण्याची नवी उमेद
२००२ पासून सुरू असलेला हिम्मतग्राम प्रकल्प देहव्यापारातील बळी महिला, एचआयव्ही-एड्स बाधित व निराधारांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. प्रकल्प संचालक हनीफ शेख यांनी सांगितले की, “आजवर तब्बल १५०० निराश व्यक्तींना आत्महत्येपासून परावृत्त करून या प्रकल्पाने जगण्याची हिंमत दिली आहे.”
“अन्न आणि प्रेम हीच खरी गरज”
नगरकर म्हणाले – “प्रथम अन्न आणि नंतर प्रेम ही माणसाची मुलभूत गरज आहे. कोविड काळात आम्ही शेकडो संस्थांना अन्नधान्य पुरविले. आता संस्थांना स्वावलंबन मिळवून देणे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे.”त्यांनी पुढे सांगितले की, संरक्षित शेती, कोंबडीपालन, फुलशेती, तांदळाचे प्रकार अशा प्रयोगांमुळे स्वावलंबन शक्य होते. “शेतीत तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य असून, माती-पाण्याचे परीक्षण व संगणकीय पिक व्यवस्थापनाने अत्यल्प मनुष्यबळातही उत्पादन वाढते.”
३५ संस्थांचे पालकत्व
“महाराष्ट्रातील ३५ संस्थांचे पालकत्व पेलणारे रवी नगरकर म्हणजे सामाजिक संस्थांची खरी माऊली आहेत,” असे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी गौरवोद्गार काढले.
१२१ लोकांचे पुनर्वसन
या प्रकल्पात आतापर्यंत एचआयव्ही, क्षयरोग बाधित, मानसिक आजारी, अत्याचारित महिला व निराधार असे एकूण १२१ जणांचे पुनर्वसन झाले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश तळेकर, निलेश शिर्के, कोमल शिर्के, नवनाथ गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
स्नेहालय,संगीता सानप