अहिल्यानगर महानगरपालिकेची धोकादायक बससेवा?..‘हिट अँड रन’ प्रकारातून थोडक्यात बचाव बसचालक तोफखाना पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शहरातील वाहतुकीला धोकादायक ठरत चाललेल्या महानगरपालिकेच्या बससेवेतील बेफाम वाहनचालक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शनिवारी प्रेमदान चौक ते सारडा कॉलेज या मार्गावर बस भरधाव वेगाने जात असताना अनेक महिला व पुरुष वाहनचालक हिट अँड रन प्रकारातून थोडक्यात बचावले.
सदर बसचालकाने रस्त्यावर इतर वाहनांना धक्के देत बेदरकार पद्धतीने गाडी चालवली. या धोकादायक प्रवासादरम्यान बसमधील प्रवासी देखील भयभीत झाले. काही महिला दुचाकीस्वार तर घाबरलेल्या स्वरात म्हणाल्या, “आम्ही थोडक्यात वाचलो; अन्यथा मोठा अपघात घडला असता.”
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हेमंत भुतकर यांनी तत्परता दाखवून कारवाई केली. त्यांनी सारडा कॉलेजसमोर स्वतःचे वाहन आडवे लावून बस अडवली. त्यांना तोफखाना पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी मदत केली. अखेर बसचालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, बसला ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर शहरवासीयांत संताप व्यक्त होत असून, “मनपा प्रशासनाने निष्काळजी व बेफाम वाहनचालकांवर कठोर कारवाई केली पाहिजे; अन्यथा प्रवाशांचे जीव धोक्यात राहतील,” अशी मागणी होत आहे.