पुणे–नाशिक महामार्ग ‘मौतचा महामार्ग’! काँक्रिटीकरणामुळे अपघातांची मालिकासुरूच ३० मृत्यूंना कारणीभूत ठेकेदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा;अन्यथा आंदोलनाचा इशारा
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):- पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा महामार्ग अक्षरशः ‘मौतचा सापळा’ ठरत आहे. आळेफाटा ते संगमनेर या दरम्यानच्या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जा, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि वाहतुकीतील बेफिकिरीमुळे गेल्या वर्षभरात तब्बल ३० नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या सर्व मृत्यूंना कारणीभूत असलेल्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली असून, कारवाई न झाल्यास महामार्गावर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
⚠️ निकृष्ट दर्जाचे काम, जीवघेणी वाहतूक व्यवस्था
पुणे–नाशिक महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम शंकर रामचंद्र कड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे असून, कामाच्या सुरुवातीपासूनच असंख्य तक्रारी होत आहेत. योग्य ठिकाणी चेतावणी फलक न लावणे, वाहतूक एकेरी करणे, काम चालू ठेवून नागरिकांना अंधारात ठेवणे अशा अनेक त्रुटीमुळे अपघात वाढले आहेत. रस्त्याचे काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे असून, या कारणामुळे अपघातात निरपराध नागरिक बळी पडत आहेत.
🔥 शिवसेनेचा संताप – “ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”
शिवसेना (शिंदे गट) मागासवर्गीय सेलचे जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची भेट घेऊन याबाबत लेखी निवेदन सादर केले. त्यांनी ठाम मागणी केली की, “या ठेकेदार कंपनीची अक्षम व बेफिकीर कार्यपद्धतीच अपघातांची मूळ कारणे आहेत. त्यामुळे या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.”भालेराव यांनी पुढे सांगितले की, ठेकेदार अभिलाश रामचंद्र कड यांना फोनवर विचारणा केली असता त्यांनी उर्मट भाषेत उत्तर देत सामाजिक कार्यकर्त्यांचा अपमान केला. “दिशा फलक का नाहीत, दर्जा खालावलेला का आहे?” असे विचारल्यावर त्यांनी उलट “तुम्ही मला ब्लॅकमेल करत आहात” असा अवमानकारक प्रतिसाद दिला, असा आरोप भालेराव यांनी केला.
🚧 वाहतूक कोंडी, ॲम्बुलन्सची अनुपलब्धता — नागरिक त्रस्त!
महामार्गावर चालणाऱ्या अव्यवस्थित कामांमुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. अपघात झाल्यास तातडीने ॲम्बुलन्स उपलब्ध होत नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासही अडचणी येत आहेत. नागरिक आणि वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी असून, प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
✊ “कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन”
भालेराव यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर या कंपनीवर गुन्हा दाखल झाला नाही, तर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर शिवसेना महायुतीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.”या निवेदनावेळी भाजपाचे गणेश दवंगे, केशव दवंगे, सोमनाथ दवंगे यांच्यासह शिवसेना महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.📍 अपघातांचा सापळा ठरलेल्या पुणे–नाशिक महामार्गावरील कामाची चौकशी करून जबाबदारांना शिक्षा न झाल्यास आगामी काळात महामार्ग आंदोलकांनी ठप्प करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.