दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र ओरबडले कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर प्रतिनिधी (दि.११ फेब्रुवारी):-श्री विशाल गणपतीचे दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने ओरबडले.सारसनगरकडे जाणार्या रोडवर भवानीनगर चौकाजवळ गुरूवारी रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली.याप्रकरणी सोनाली अमोल मुथा (वय 28 रा. महावीर कॉलनी,भगवान बाबा चौक, सारसनगर) यांनी शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरूवारी संकष्ट चतुर्थी असल्याने सोनाली, त्यांचे पती अमोल व मुलगी याज्ञा हे तिघे गुरूवारी रात्री 10 वाजता दुचाकीवरून माळीवाडा येथील श्री विशाल गणपती मंदिरात दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले.अमोल दुचाकी चालवत होते तर सोनाली व मुलगी याज्ञा पाठीमागे बसली होती. त्यांची दुचाकी भवानीनगर चौकाजवळ येताच अॅरो कॉम्पुटर अॅकॅडमीसमोर दुचाकीवर पाठीमागून आलेल्या चोरट्याने सोनालीच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबडून धूम ठोकली. सदरच्या चोरट्याने तोंडाला मफलर गुडाळलेली होती. तो 25 ते 30 वयोगटातील असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनाली मुथा यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.