पोलीस अधीक्षकांनी पारधी समाज बांधवा सोबत साजरी केली दिवाळी..!कामरगाव पारधी पालावर मिठाई,साडीचोळी वाटप करून दिला संवेदन शीलतेचा संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सामाजिक जाणिवेचा अनोखा संदेश देत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यंदाची दिवाळी पारधी समाजाच्या पालावर साजरी केली.नगर तालुक्यातील कामरगाव जवळील पारधी वस्तीत सोमवारी त्यांनी मिठाई व साडीचोळी वाटप करत समाजातील नागरिकांना सणाचा आनंद दिला.या वेळी ग्रामीण पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते,तसेच सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले उपस्थित होते.
भोसले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. राज्यभरातील पारधी वस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कार्य ते करीत आहेत,जेणेकरून या समाजावर अनाठायी आरोप होऊ नयेत.कामरगाव वस्तीत गेल्या वर्षी बसविलेले कॅमेरे पाहून पोलीस अधीक्षक घार्गे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.“पारधी समाजातील मुले शिक्षण घेत राहिली,महिला व पुरुष रोजगाराच्या क्षेत्रात उतरले तर समाज प्रगती साधेल,” असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक घार्गे यांनी यावेळी केले.सामाजिक कार्यकर्ते भोसले म्हणाले, “आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रतिष्ठा देणे आवश्यक आहे.शासनाच्या सर्व योजना पारधी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”
🪔संवेदनशीलता,सामाजिक बांधिलकी आणि समाज ऐक्याचा सुंदर संगम म्हणजे पोलीस अधीक्षकांची ही दिवाळी!
