“काळी दिवाळी” साजरी करून वंचित बहुजन आघाडीने आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानासमोर केले तीव्र आंदोलन!..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-ओल्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच शासकीय जमिनीवरील गरीबांची अतिक्रमणे नियमित करावीत,या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानासमोर चटणी-भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली.वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसनराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी “शेतकरी विरोधी फडणवीस सरकारचा निषेध असो!” अशा घोषणा दिल्या. यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य राहुल दादा राजळे आणि नायब तहसीलदार किशोर सानप यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.मात्र वंचित नेत्यांनी “आम्ही प्रशासनाला आधीच निवेदन दिले आहे,आता आम्ही थेट निषेधच करणार!” अशी भूमिका घेतली.
प्रा.किसनराव चव्हाण म्हणाले की, “शेवगाव-पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत,पण स्थानिक कारखानदार आणि आमदार मौन बाळगत आहेत.आता विरोधी पक्षाची खरी भूमिका वंचित बहुजन आघाडीच बजावणार आहे.”राहुल राजळे यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेले चहापानाचे निमंत्रण आंदोलनकर्त्यांनी नाकारले आणि आमदारांच्या दारातच बसून चटणी-भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष योगेश साठे,शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख,पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे, सुधीर ठोंबे,कल्याण भागवत, अरुण झांबरे,सूरज क्षेत्रे,राजीव भिंगारदिवे,शाहूराव खंडागळे, पोपट जाधव,हनीफ शेख, ऑगस्टीन गजभिव,अमोल शिंदे, सुंदर आल्हाट,रवींद्र निळ,सुनील साळवे,अनिकेत गोसावी,विठ्ठल मगर,गोरख तुपविहिरे,दादा गाडेकर,सलीम जिलानी,संदीप घाडगे यांच्यासह शेवगाव,पारनेर, पाथर्डी व नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश चिटणीस फिरोज पठाण यांनी आंदोलन स्थळी लेखी पाठिंबा दर्शवला.
