शिक्षकांना सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी सायबर पोलीसांचा माहितीपूर्ण उपक्रम.. शिक्षकांना दिले ‘डिजिटल सुरक्षा धडे’”
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सर्वसामान्य नागरिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचारी सजग राहावेत,या उद्देशाने सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर यांच्या वतीने अक्षर सेवा इंटरनॅशनल (रामराव चव्हाण प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, MIDC) येथे सायबर अव्हरनेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमात सायबर पोलीस निरीक्षक श्री.मोरेश्वर पेंदाम,उपनिरीक्षक श्री.सुदाम काकडे,पोलीस नाईक अभिजीत अरकल,महिला पोलीस नाईक दीपाली घोडके,तसेच प्राध्यापक वैभव लोंढे यांनी मार्गदर्शन केले.प्रारंभी पोना.अभिजीत अरकल यांनी सायबर गुन्ह्यांचे प्रकार,मोबाईल हॅकिंग,फेक अकाउंट्स,आर्थिक फसवणूक, डिजिटल अरेस्ट यांसारख्या विषयांवर सविस्तर माहिती दिली.

त्यांनी सायबर गुन्हे कसे घडतात आणि त्यापासून कसे वाचता येते याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह स्पष्टीकरण केले.यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री.सुदाम काकडे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे विविध फसवणुकीचे प्रकार डेबिट-क्रेडिट कार्ड फसवणूक, बँक डिटेल्स व ओटीपी शेअरिंग, फेक वेबसाईट्स,गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक,एपीके लिंकद्वारे बँक माहिती चोरी याबाबत माहिती दिली.त्यांनी शिक्षकांना “सावध राहा आणि अनोळखी लिंकवर क्लिक करू नका!” असा इशारा दिला.पोलीस निरीक्षक पेंदाम यांनी मोबाईल दहशतवाद,आर्थिक फसवणूक टाळण्याचे उपाय,तसेच नव्या सायबर फ्रॉडचे उदाहरणे देत मार्गदर्शन केले.प्राध्यापक वैभव लोंढे यांनी सायबर फसवणूक करणाऱ्यांचे ‘फुकट गिफ्ट’ व ‘लॉटरी’सारखे आमिष ओळखून सतर्क राहण्याचे आवाहन केले.महिला पोलीस नाईक दीपाली घोडके यांनी नागरिकांना 1930 आणि 1945 या पोर्टलवर तक्रार कशी करावी,तसेच फसवणुकीचे पैसे होल्ड करून परत मिळविण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी सायबर गुन्हे,डिजिटल अरेस्ट,युपीआय फसवणूक, ऑनलाईन व्यवहार,व्हॉट्सअॅप हॅकिंग,नायजेरीन फ्रॉड या विषयांवरील शंका विचारल्या व त्यांचे निरसन करण्यात आले.कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला असून सर्व शिक्षकांनी सायबर सुरक्षिततेविषयी महत्त्वपूर्ण माहिती आत्मसात केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
