प्रत्येक भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी हवीच राजूभाई साबळे यांची पोलीस उपयुक्तांकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत बंद अवस्थेत असलेल्या सर्व पोलिस चौक्या तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.दि.29 ऑक्टोबर 2025 रोजी पक्षाचे प्रमुख राजूभाई साबळे यांनी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.राजूभाई साबळे यांनी निवेदनात नमूद केले की, “छत्रपती संभाजीनगर शहर वेगाने विस्तारत असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
शहराच्या वाढीच्या प्रमाणात पोलिस चौक्यांची संख्या अत्यल्प असून अनेक चौक्या बंद स्थितीत आहेत. त्यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पोलिस मदत मिळत नाही. परिणामी चोरी, घरफोडी, महिलांवरील अत्याचार आणि अन्य गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.”त्यामुळे शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत नव्याने पोलिस चौक्या सुरू करून त्या ठिकाणी पुरेशा पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली. चौक्यांमुळे स्थानिक पातळीवर पोलिसांची उपस्थिती वाढेल, गुन्हेगारांमध्ये कायद्याचे भय निर्माण होईल, तसेच घटनास्थळी पोहोचण्याचा वेळ (response time) कमी होईल, असे मतही साबळे यांनी व्यक्त केले.तसेच शहरातील विद्यालये व महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपरी, गुटखा व सिगारेट विक्रीवरील बंदी तात्काळ लागू करावी, कारण अशा ठिकाणी टवाळखोर तरुण जमा होऊन मुलींना त्रास देतात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही मागणी तातडीने मान्य करावी, अशी विनंतीही रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने केली आहे.या शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती, शहराध्यक्ष रणजीत मनोरे, मध्य शहराध्यक्ष संतोष जाधव, राजकुमार अमोलिक, प्रकाश घोरपडे, अनिस गंगापूरकर, सुधाकर साबळे, शाकेर जेके, कलीम शेख, सलमान शहा, प्रदीप धनेधर आदी मान्यवर उपस्थित होते.
