राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी अर्जांचा पाऊस..! अहिल्यानगरच्या १७ प्रभागांमधून तब्बल २०० हून अधिक अर्ज..
अहिल्यानगर (दि.2 नोव्हेंबर प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून आज इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले.शहरातील १७ प्रभागांमधून तब्बल २००ते २०० हून अधिक अर्ज आज दाखल झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाअध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली.सर्व अर्जांची तपशीलवार माहिती संकलित करून ती मंगळवारी होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत सादर करण्यात येणार आहे.या बैठकीस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार,तसेच राज्यातील सर्व जिल्हा व शहर अध्यक्ष उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीनंतर पक्षातील पुढील उमेदवारीची प्रक्रिया ठरविण्यात येणार आहे.स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहता अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने तयारीस लागल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान,नव्याने तयार झालेला प्रभाग क्रमांक चार हा या निवडणुकीत विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.मुकुंदनगर, फकीरवाडा,गोविंदपुरा आणि दर्गा दायरा या भागांचा समावेश असलेला हा प्रभाग मुस्लिम बहुल असून,येथील उमेदवार निवडीत पक्ष सावध पावले उचलणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी अलीकडे घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका लक्षात घेता,या प्रभागातून कोण उमेदवार मैदानात उतरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रभागातूनही काही अर्ज आले असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप आणि अध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली.राज्यस्तरीय बैठकीनंतर अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारीचा मार्ग अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
