महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर;पारदर्शक प्रक्रियेत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आज,सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षणासाठी पारदर्शक पद्धतीने सोडत काढण्यात आली. महानगरपालिकेच्या सभागृहात ही सोडत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आली.या वेळी आरक्षण प्रक्रियेबाबतची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.आयुक्त डांगे यांनी सांगितले की, आरक्षण सोडतीनंतरचा निकाल राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून आयोगाच्या मान्यतेनंतर प्रारूप आरक्षण १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

त्यानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत दिली जाणार आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर विचार करून २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत निर्णय घेतला जाईल. अंतिम आरक्षण २ डिसेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली. अनुसूचित जमातींसाठी एक जागा प्रभाग क्रमांक सातमध्ये निश्चित करण्यात आली आहे. तसेच, अनुसूचित जातींसाठी एकूण नऊ जागा राखीव ठेवण्यात आल्या असून त्यापैकी पाच महिला जागा चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आल्या आहेत.नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण १८ जागा राखीव असून त्यापैकी १७ जागा थेट आरक्षणाद्वारे निश्चित करण्यात आल्या आहेत. उर्वरित एक जागा सोडतीद्वारे निश्चित करण्यात आली. तसेच, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या नऊ जागांपैकी सहा थेट आरक्षणाद्वारे आणि तीन जागा सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या.महानगरपालिकेच्या एकूण जागांपैकी ४० जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यापैकी २० जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांना प्रक्रियेचा पारदर्शक अनुभव मिळाला.
