धक्कादायक प्रकार..!नगर तालुक्यातील कर्जुने खारे गावात ६ वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेले परिसरात भीतीचे सावट
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील कर्जुने खारे गावात सोमवारी (दि.१२ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.केवळ ६ वर्षांच्या निरागस चिमुरडीला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कर्जुलेखारे येथील गट नं.२२० मध्ये संध्याकाळी सुमारे ७.२० ते ७.३० या दरम्यान रियंका सुनील पवार ही लहानगी मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर झडप घालत तिला उचलून नेले. हा प्रकार एवढा अचानक घडला की आसपासच्या लोकांना काहीच कळले नाही.क्षणात घडलेली ही घटना पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले असून नागरिक रात्री घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत.
ग्रामपंचायत,वनविभाग आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्याचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याच्या हालचाली दिसून येत होत्या.मात्र अशा प्रकारे लहान मुलीला उचलून नेण्याच्या घटनेने प्रशासनाला धक्का बसला आहे.नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.परिसरातील नागरिकांमध्ये अद्यापही भितीचं वातावरण असून,हा प्रकार टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने रात्री गावात गस्त वाढविण्यात आली आहे.
