स्थानिक गुन्हे शाखेची पश्चिम बंगालमध्ये धडाकेबाज कारवाई ५१ लाखांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत टोळी जरबंद..पश्चिम बंगालमध्ये पोलिसांची थरारक शोध मोहीम वाचा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील सराफ व्यावसायिकाच्या दुकानातून तब्बल एक कोटीहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या टोळीला अखेर पोलीसांनी पकडले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पश्चिम बंगालमध्ये थरारक कारवाई करून या प्रकरणातील चार आरोपींना ताब्यात घेतले असून ५१ लाख १३ हजार ७९५ रुपये किंमतीचे, ५७२.७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.फिर्यादी कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२,रा. गायकवाड कॉलनी,सावेडी रोड, अहिल्यानगर) हे होलसेल सोन्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानात काम करणारे दीपनकर माजी,सोमीन बेरा, सोमनाथ सामंता,आन्मेश दुलोई, सत्तु बेग आणि स्नेहा बेरा या कामगारांनी विश्वास संपादन करून लबाडीच्या इराद्याने तब्बल ₹१,०१,०५,००० किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पलायन केले.या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ९८७/२०२५, बीएनएस कलम ३१६(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी अमरागरी,जिल्हा हावरा, पश्चिम बंगाल येथे लपलेले असल्याचे निष्पन्न झाले.
तत्काळ पथकाने तेथे जाऊन शक्कल लढवून सोमेन शांती बेरा उर्फ कार्तीक,दिपनकर आरुण माजी, अनिमेश मनोरंजन दोलुई आणि सोमनाथ जगन्नाथ सामंता यांना अटक केली.चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचे साथीदार सन्तु बेरा व स्नेहा बेरा हे फरार असल्याचे उघड झाले.ताब्यातील आरोपींकडून ५१.१३ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांना पुढील तपासासाठी कोतवाली पोलीसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.या धाडसी कारवाईत पोउपनि.संदीप मुरकुटे,पोलीस अंमलदार शाहिद शेख,गणेश धोत्रे,फुरकान शेख,दिपक घाटकर,भिमराज खर्से,राहुल डोके,सतिष भवर,प्रशांत राठोड यांनी उत्कृष्ट समन्वय साधून कारवाई यशस्वी केली.
