अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू…आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
अहिल्यानगर (दि.१३ प्रतिनिधी):-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७(१)(३) नुसार जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश १८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.या आदेशानुसार नागरिकांनी तलवार, बंदूक,चाकू,गदा,काठी,दांडकं, स्फोटके किंवा कोणतेही प्राणघातक शस्त्र बाळगणे, वाहून नेणे किंवा प्रदर्शित करणे यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन जमाव करणे, सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासही मनाई आहे.तथापि, धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका व प्रेतयात्रांदरम्यान जमलेला जमाव या आदेशातून वगळण्यात आला आहे. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि ज्यांनी सभा किंवा मिरवणूक काढण्यासाठी अधिकृत परवानगी घेतली आहे, त्यांनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी गिते यांनी स्पष्ट केले आहे की, “कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”प्रशासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून पोलिसांकडूनही गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
