बालदिन उत्सवात पप्पेट शोची धमाल..शारदा सदन प्राथमिक शाळेत मुलांचा आनंद शिगेला!..बालदिन उत्साहात साजरा..
केडगाव (प्रतिनिधी):-केडगाव येथील शारदा सदन प्राथमिक शाळेत बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.या विशेष दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून पा.योहान दासनं उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आकर्षक पप्पेट शो सादर केला. त्यांच्या या कला निर्देशनामुळे मुलांमध्ये जबरदस्त आनंदाची लहर पसरली आणि कार्यक्रमाला एक वेगळा रंग मिळाला.शाळेच्या मुख्याध्यापिका अरुनिमा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांनी मुलांचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.

तर स्मिता इंगळे मॅडम यांनी पंडित नेहरू यांचा जीवनपरिचय प्रभावी शैलीत मांडत बालदिनाचे महत्त्व समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या पुढील सत्रात शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांसाठी गीतगायनाचा कार्यक्रम सादर केला ज्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊचे वाटप करून त्यांचा आनंद अधिक वाढवण्यात आला.बालदिनाचा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची उधळण करणारा ठरला आणि शाळेतला हा दिवस संस्मरणीय बनला.
