गावठी कट्टा विक्रीत तीन जण रंगेहात पकडले..LCB ची झडप..! लाखोंचा मुद्देमाल जप्त…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्र धारकांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने मोठी कामगिरी साधली आहे.श्रीरामपूर शहरातून गावठी कट्टा विक्रीसाठी येणाऱ्या तीन जणांना रंगेहात पकडत एकूण 7 लाख 82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.समीर अभंग,पोलीस अंमलदार गणेश लोंढे,फुरकान शेख,संतोष खैरे,योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ,रमिझराजा आतार,अरुण मोरे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.
दि.14/11/2025 रोजी बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की,तीन इसम बेलापूरहून श्रीरामपूरकडे गावठी कट्टा विक्रीसाठी कारमधून येत आहेत.त्यानुसार अनारसे हॉस्पिटलसमोर सापळा रचण्यात आला.संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता गावठी कट्यासह आनंदा यशवंत काळे,विशाल बबन सोज्वळ,विजय यशवंत काळे (रा.श्रीरामपूर,जिल्हा अहिल्यानगर) असे गाडीत आढळले.तिन्ही आरोपींना मुद्देमालासह श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात देण्यात आले असून भारतीय हत्यार कायदा 3/25,7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी आनंदा यशवंत काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून,त्याच्यावर चोरी,घरफोडी, आर्म्स अॅक्ट अशा गंभीर कलमांसह 9 गुन्हे नोंद आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
