मोठा आवाज करून शहरात धिंगाणा घालणाऱ्या १४ बुलेट रायडर्सना कोतवाली पोलिसांची चपराक! मोठी दंडात्मक कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शहरात मोठा आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकलींवर अखेर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई करत १४ बुलेट रायडर्सना ताब्यात घेतले.ही कारवाई दि.१३ नोव्हेंबर रोजी पोलिस निरीक्षकांच्या पथकाने केली आहे.अवैधपणे ‘सालेंसर’ काढून कर्णकर्कश आवाज करीत फिरणाऱ्या रायडर्सना कोतवाली पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली व कायनेटिक चौक येथे नाकाबंदी करून परिसरात थांबवून वाहनांची तपासणी केली.

पोलिसांनी या सर्व १४ मोटारसायकली जप्त करून त्यांच्या वाहनांवरील अवैध फेरफार,आवाज प्रदूषण तसेच संबंधित नियमांचे उल्लंघन याबाबत दंडात्मक कारवाई करत एकूण १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला.या मोहिमेत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली,कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, मधुकर इंगळे,म.पोलीस उपनिरीक्षक अमीना शेख, पोलीस अंमलदार विजय काळे,बाळकृष्ण दौंड,सुनील शिरसाट,विजय ठोंबरे, गुलाब शेख,सोमनाथ राऊत, महिला पोलीस अंमलदार श्वेता परमारसागर यांनी केली आहे. यावेळी पोलिसांनी सांगितले की,शहरात अवैधपणे बदललेल्या सालेंसरमुळे निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पुढील काळातही अशाच धडक मोहिमा राबविल्या जातील.नागरिकांच्या शांततेस बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाईच केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
