२४ तासांत दोन बिबटे जेरबंद..मात्र खारेकर्जुने-इसळक-निंबळक परिसरात अजूनही दहशत!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुक्यातील खारेकर्जुने व निंबळक परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत.पाच वर्षांच्या चिमुरडीचा बळी आणि आठ वर्षांच्या मुलावर गंभीर हल्ल्यानंतर नागरिकांचा संताप उफाळून आला होता. त्याच दहशतीच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव),महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश रविवारी जारी केले.दरम्यान रविवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात एक बिबट्या अडकला.सोमवारी सकाळी त्या पिंजर्यातील बिबट्याला विभागाचे पथक घेऊन गेले.मात्र या संपूर्ण कारवाईची कल्पना ग्रामस्थांना दिली नसल्याने नागरिक आक्रमक झाले आणि विभागाच्या कर्मचाऱ्यांना लोकांनी जाब विचारत संताप व्यक्त केला.

विहिरीत दुसरा बिबट्या ठार मारण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम
सोमवारी दुपारी खातगाव रोडवरील पानसंबळ वस्ती परिसरातील एका विहिरीत आणखी एक बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले.ही माहिती मिळताच गावभर खळबळ उडाली आणि पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली.वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मात्र गावकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली
“हा नरभक्षक बिबट्या आहे! याला बाहेर काढू नका; ठार करा!”काही महिलांनी तर ‘बिबट्याला सोडले,तर आम्ही फाशी घेऊ!’ असा आक्रमक इशाराही दिला.वनविभागाकडून मात्र नागरिकांना समजावून सांगण्यात आले की,बिबट्याचा डीएनए केल्यानंतरच त्याला ठार मारण्याचा निर्णय अंतिम होईल.यानंतर पोलिस,वन विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने मोठा रेस्क्यू ऑपरेशन राबवून पिंजरा विहिरीत सोडून अखेर बिबट्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश आले.ही सलग कारवाई पाहता बिबट्यांच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण येण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, नागरिकांची भीती अद्यापही कायम आहे.
