गॅस माफियांना स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा जबर धक्का..!गॅस सिलेंडर रॅकेटचा भांडाफोड!
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शहरात घरगुती गॅस सिलेंडरची विनापरवाना आणि बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटवर स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी मोठी कारवाई करत 10 लाख 85 हजार रुपये किमतीचा महत्त्वपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. एका पिकअप वाहनातून 110 भरलेल्या व रिकाम्या एच.पी. कंपनीच्या गॅस टाक्या बेकायदेशीररीत्या वाहतूक करत असताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई दि.17 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम पिकअप गाडी (क्र. एमएच-42 बीएफ-7981) मधून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर भरून एमआयडीसी ते केडगाव बायपास रोडने जात आहे.त्यानुसार सपोनि हरिष भोये, पोलीस अंमलदार सुनिल पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख व अर्जुन बडे यांच्या पथकाने कल्याण चौफुला परिसरात सापळा रचला. संशयित वाहन येताच पथकाने त्याला थांबवून चालकाची चौकशी केली. त्याने स्वतःचे नाव उमेश बाळासाहेब चांदगुडे (वय 37, रा. सुपा, ता. बारामती, जि. पुणे) असे सांगितले.
पुढील तपासात त्याच्याकडे कोणताही परवाना नसताना तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गॅस सिलेंडरची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी वाहतूक करीत असल्याची कबुली दिली. चढ्या भावात गॅस विक्री करून नफा कमविण्याचा त्याचा उद्देश होता.एच.पी. गॅस कंपनीच्या 110 भरलेल्या व रिकाम्या टाक्या – ₹3,85,000 किमतीच्या एकूण जप्ती – ₹10,85,000…या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे पोहेकॉ सुनिल विनायक पवार यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 287, 288, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3, 7, एलपीजी पुरवठा व वितरण नियमन आदेश 2000 चे कलम 3(2)(b), गॅस सिलेंडर अधिनियम 2016 ची कलमे 43, 45, 46 तसेच स्फोटके अधिनियम 1884 चे कलम 9(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जलद व अचूकरीत्या पार पाडण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
