अपहरण व खंडणी मागणारी गँग जेरबंद..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राहुरी तालुक्यातील तांभेरे नागरिकाचे अपहरण करून दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.तांत्रिक विश्लेषण,गुप्त माहिती आणि पोलिसांच्या व्यावसायिक कौशल्याच्या बळावर चार आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण कमी झाले आहे.फिर्यादी बापुसाहेब रामदास गागरे (वय 39, रा. तांभोरे,ता.राहुरी) हे 13 ऑक्टोबर 2025 रोजी घरातून ड्रायव्हरला घेण्यासाठी वाकडी (ता. राहाता) येथे जात होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला. निळवंडे कॅनलजवळ संशयितांनी फिर्यादीस हत्याराचा धाक दाखवून गाडीत बसवले व एका निर्जन गोडाऊनमध्ये नेऊन मारहाण केली. दहा लाखांची खंडणी मागत “पैसे दिले नाहीत तर कुटुंबासह ठार मारू” अशी धमकी दिली.फिर्यादीने पैसे देण्याचे सांगितल्यावर आरोपींनी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना शनिशिंगणापुर फाट्याजवळ सोडून दिले. त्यानंतरही आरोपी फोनवरून सतत खंडणी मागत धमक्या देत होते.
याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 1163/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.पोउपनि संदीप मुरकुटे,अंमलदार फुरकान शेख,रिचर्ड गायकवाड, रमिजराजा आत्तार,प्रशांत राठोड, विशाल तनपुरे,महिला अंमलदार सोनाली भागवत व चालक अरुण मोरे हे पथक 17 नोव्हेंबर रोजी तांत्रिक माहितीच्या आधारे पुण्यात दाखल झाले.पथकाने कोथरुड परिसरात संशयितांचा शोध घेतला असता चार आरोपी सापडले.त्यांची चौकशी केली असता त्यांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.ओम अशोक ठोंबरे (20 वर्षे) – रा. सुतारदरा, जि. पुणे, मुळ रा. देवगाव (ता. नेवासा,अजय शंकर हुलावळे (21 वर्षे) – रा. सुतारदरा, जि. पुणे,सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे (19 वर्षे) – रा. तांभेरे, ता.राहुरी,साई परमेश्वर ढवळे (18 वर्षे) – रा. भेंडा, ता. नेवासा,अजय हुलावळे याने चौकशीत कबुली देताना उर्वरित दोन आरोपींची नावे सांगितली रामेश्वर उर्फ राया (फरार) – जि. पुणे,रोहित रुईकर (फरार) – रा. भेंडा, ता.नेवासा आरोपींच्या सांगण्यावरून 1 लाख 19 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.ताब्यातील आरोपींना राहुरी पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आले असून पुढील तपास तेथे सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
