पवनचक्की प्रकल्पात दहशत! राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची २ लाखांची खंडणीची मागणी..सिक्युरिटी गार्डला मारहाण करत कार्यालयाची केली तोडफोड
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-ऊर्जा प्रकल्पांवर राजकीय दबाव, खंडणी मागणी आणि दहशत माजवण्याच्या घटनांना ऊत आलेला असताना जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दरोडी येथील सेनवियान पवनचक्की प्रकल्पात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या पदाधिकाऱ्याकडून खंडणीसाठी हल्ला करण्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष विकास राघु पवार हा मुख्य आरोपी असून, त्याच्या सोबतच्या ७–८ जणांच्या टोळक्याने थेट प्रकल्पाच्या कार्यालयात घुसून दहशत निर्माण केली.सिक्युरिटी गार्डला बेदम मारहाण,कार्यालयातील तोडफोड आणि दरमहा २ लाखांची खंडणी मागणी अशा गंभीर आरोपांची फिर्याद पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.१८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले हे कर्तव्यावर असताना विकास पवार अचानक कार्यालयात घुसला.पवारने घुले याची गचांडी पकडून खुर्चीवरून खाली ओढले लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.हातातील कोयता थेट गळ्याजवळ लावून जीव घेण्याची धमकी दिली “कंपनी बंद का नाही केली? येथे काम करायला कोणी सांगितले?” असा दम दिला.
इतक्यात त्याच्या मागून आलेल्या ७–८ जणांच्या टोळक्याने दांडके,दगड घेऊन कार्यालयात हाहाकार माजवला.मारहाणीच्या दरम्यान आरोपी पवारने दरमहा २ लाख रुपये खंडणी हवीच,असे स्पष्ट सांगितले.शिवाय घुले यांच्या खिशातील २२ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली, अशी तक्रार नोंदवली आहे.कार्यालयात चाललेल्या धुडगुशीदरम्यान साईड इन्चार्ज किरण पवार घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींच्या तावडीतून गार्ड घुले यांची सुटका केली.या प्रकरणी ठेकेदार चंद्रभान ठुबे यांनी सांगितले की,५ नोव्हेंबर रोजीही विकास पवार कार्यालयात येऊन गार्डला धमकावून गेला होता.कंपनीचे दररोज १०–१२ लाखांचे नुकसान या तोडफोडीमुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या १० वर्षांपासून (२०१६ पासून) कंपनी येथे कायदेशीररीत्या काम करत असून कधीच कुणी अडथळा आणला नव्हता महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडून अधिकृत परवाना प्राप्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या संपूर्ण घटनेनंतर मुख्य आरोपी विकास राघु पवार आणि त्याच्या साथीदारांविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
