अकोळनेर येथे १५ फेब्रुवारी रोजी २५२५ कुंडात्मक महाशिवयाग..महाशिवरात्रीला देशातील सर्वात भव्य-दिव्य आध्यात्मिक सोहळा..सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने ऐतिहासिक आयोजन..गुरुवर्य अशोक दादा जाधव यांचे होणार मार्गदर्शन
नगर प्रतिनिधी (दि.१४ फेब्रुवारी):-नगर तालुक्यातील अकोळनेर या पवित्र भूमीत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतातील सर्वात मोठ्या आणि भव्य-दिव्य अशा २५२५ कुंडात्मक महाशिवयाग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा ऐतिहासिक सोहळा सदगुरू शंकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच गुरुवर्य अशोक दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि.१५ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.अकोळनेर येथील भव्य तीर्थक्षेत्री या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुंडात्मक शिवयाग यापूर्वी कोठेही पार पडलेला नसल्याने हा सोहळा संपूर्ण भारतात लक्षवेधी ठरत आहे.राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक या दिव्य सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सदगुरू शंकर महाराज मठ, शिवाजीनगर,केडगाव यांच्या वतीने देण्यात आली.विशेष म्हणजे,या महाशिवयागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून सर्व सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्यामुळे सर्वसामान्य भक्तांनाही या पुण्यप्रसंगी सहभागी होता येणार आहे.
🔶 कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा
सकाळी ६ ते ८: श्रींचा महारुद्र अभिषेक
सकाळी ८ ते दुपारी १२: भव्य-दिव्य महाशिवयाग सोहळा
दुपारी १२ ते १: महादेवांचा पालखी सोहळा
दुपारी १ ते १.३०: शिवपार्वती विवाह सोहळा
दुपारी १.३० ते ३: भजन सेवा
दुपारी २ ते ५: महाप्रसाद
या संपूर्ण सोहळ्यात वैदिक मंत्रोच्चार, भक्तीमय वातावरण आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.
🔴 होम-हवनासाठी आणावयाचे साहित्य
भाविकांनी खालील साहित्य सोबत आणावे –
ताम्हण १, ताट १, गडवा १, वाट्या २, चमचे २, बसायचे आसन २, काळे तीळ अर्धा किलो, साखर १ किलो, तूप १ किलो (मठामध्ये उपलब्ध), खोबरेवाटी १, हार-फुले-प्रसाद स्वइच्छेने, बेलपत्र १०८, हळद-कुंकू, गंध, अक्षदा, कापूर, अगरबत्ती, काडीपेटी.
🔔 पारंपरिक पेहराव अनिवार्य
या पवित्र सोहळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता सर्वांनी पारंपरिक पेहराव करणे अनिवार्य ठेवण्यात आले आहे. महिलांनी पांढरी साडी तर पुरुषांनी पांढरा कुर्ता-पायजमा परिधान करणे बंधनकारक आहे.महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर २५२५ कुंडांचा महायज्ञ, हजारो भक्तांचा सहभाग, वैदिक मंत्रघोष आणि भक्तीचा महासागर—अकोळनेर येथे होणारा हा ऐतिहासिक महाशिवयाग सोहळा आध्यात्मिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे.
