Crime..राज चेंबर समोर तरुणावर मध्यरात्री फायरिंग करणारे आरोपी पकडले स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांची संयुक्त कारवाई..
अहिल्यानगर (प्रतिनिधी दि.१४):- अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरातील राज चेंबरसमोर crime गावठी कट्ट्यातून फायरिंग करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि तोफखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाईत जेरबंद केले आहे.या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.फिर्यादी अबरार मुक्तर शेख (वय २४,रा. प्रबुद्धनगर,आलमगीर,भिंगार, ता.जि.अहिल्यानगर) यांनी अफजल आसीर शेख व अस्लम आसीर शेख यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेतला नाही,याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने कट रचला.दि.११/०२/२०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता फिर्यादी हा मित्र अभिषेक पवार यांच्या मोपेडवरून मुकुंदनगरकडे जात असताना, रॉयल ट्रॅव्हल्स कार्यालयासमोर राज चेंबर,कोठला येथे आरोपींनी दुचाकीसमोर ऑटो रिक्षा आडवी लावली.त्यानंतर आरोपी सय्यद जैद रशीद उर्फ टैप्या याने गावठी कट्ट्यातून फायर करून फिर्यादीस ठार मारण्याचा प्रयत्न केला.या घटने प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 85/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 कलम 109, 126(2), 61(2), 352, 351, 3(5) सह आर्म ऍक्ट 3/25, 7, 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलीस स्टेशनची विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्याचे आदेश दिले.तांत्रिक तपास,गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दि.१३/०२/२०२६ रोजी आरोपी जाबीर उर्फ जबु सादीक सय्यद (वय ३४, रा. मुकुंदनगर) हा सारसनगर परिसरातील कोंबडीवाला मळा येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने कबुली देताना सांगितले की,तो व त्याचे साथीदार कादर उर्फ पप्पु मुस्सा शेख (रा.कोठला झोपडपट्टी) व जैद उर्फ टैप्या रशीद सय्यद (रा. आलमगीर) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून रिक्षातून येऊन जैद याने गावठी पिस्तुलातून अबरार शेख याच्यावर जीवघेणा गोळीबार केला.त्यानुसार पोलिसांनी उर्वरित दोन्ही आरोपींनाही शहरातून ताब्यात घेतले असून जैद उर्फ टैप्या याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.आरोपी जैद उर्फ टैप्या रशीद सय्यद हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात खूनाचा प्रयत्न,दरोडा,शस्त्र कायदा,मारहाण,महिलांवरील अत्याचार आदी गंभीर स्वरूपाचे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत.
जाबीर उर्फ जबु सादीक सय्यद याच्याविरुद्ध तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून त्याला दि. ३०/०६/२०२५ पासून दोन वर्षांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले होते.कादर उर्फ पप्पु मुस्सा शेख याच्या विरुद्ध देखील खूनाचा प्रयत्न, दंगल, मारहाण आदी गुन्ह्यांची नोंद आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार विजय पवार,शाहिद शेख,गणेश धोत्रे,सुनील पवार, फूरकान शेख,भीमराज खरसे, अमृत आढाव,सागर ससाने अर्जुन बडे,तोफखाना पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पोलीस अंमलदार रियाज इनामदार,सुजय हिवाळे,सुमित गवळी कपिल गायकवाड यांनी केली आहे.
