🔴crime..तोतया ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक’ अखेर जेरबंद..!सायबर पोलिसांचा गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागात सिनेस्टाईल पाठलाग
अहिल्यानगर (प्रतिनिधी (दि.१४ फेब्रुवारी २०२६):-पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सामान्य नागरिकांना अटक करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत आणि उच्चशिक्षित आरोपीला अहिल्यानगर सायबर पोलिसांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून थरारक पाठलाग करून अटक केली आहे.या धाडसी कारवाईमुळे सायबर गुन्हेगारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून,पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.अहिल्यानगर येथील एका नागरिकाला फोन करून आरोपीने स्वतःची ओळख ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील’ अशी करून दिली.“तुमच्याविरुद्ध गंभीर तक्रार आली असून, तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना अटक करावी लागेल. कारवाई टाळायची असेल तर ५ लाख रुपये द्या,” अशी धमकी देत त्याने खंडणीची मागणी केली.आरोपीने अत्यंत तांत्रिक पद्धतीचा वापर करून फिर्यादीला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता.या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ०३/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ३०८(३), २०४, ३५१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढला.पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखालील पथक गडचिरोली जिल्ह्यात रवाना झाले.
आष्टी (ता.चामोर्शी) परिसरात पोलिसांची चाहूल लागताच आरोपी चंदन दिगूराम सांगळे (वय ३०,रा.आष्टी) याने आपल्या स्विफ्ट कारमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला.मात्र नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असूनही पोलिसांनी धाडसाने पाठलाग करत स्थानिक आष्टी पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेला चंदन सांगळे हा बी.ई. (इंजिनिअरिंग) शिक्षित आहे.आपल्या तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर करून तो इंटरनेटवरून विविध होस्टेल चालक,लॉज मालक यांची संपर्क माहिती मिळवत असे आणि त्यांना ‘पोलीस अधिकारी’ असल्याचे सांगून धमकावत फसवणूक करत असे.त्याच्या विरुद्ध यापूर्वी रत्नागिरी आणि गोंदिया जिल्ह्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.गुन्ह्यात वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक काकडे, एचसी बनकर,एचसी कारखेले, पीएन अरकल, पीसी हिंगे, चालक एएसआय शेख तसेच सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने ही धाडसी कामगिरी बजावली.अनोळखी व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून फोनवरून धमकी दिल्यास किंवा पैशांची मागणी केल्यास घाबरून न जाता तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किंवा सायबर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
