स्मार्ट मीटरवरून महावितरणला इशारा..! योजना तात्काळ रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरणार रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा इशारा
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-महावितरणकडून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट मीटर’ योजनेला रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने तीव्र विरोध दर्शवित योजना तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे आणि जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदनातील प्रमुख आक्षेप
पक्षाने स्मार्ट मीटर योजने विरोधात काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत.
आर्थिक बोजा :
स्मार्ट मीटरमुळे वीज दरात छुप्या पद्धतीने वाढ होण्याची शक्यता असून प्रीपेड प्रणालीमुळे कष्टकरी आणि मध्यमवर्गीय नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
पारदर्शकतेचा अभाव :
रिचार्ज संपताच वीज पुरवठा खंडित होण्याची पद्धत गरीब कुटुंबांसाठी अन्यायकारक असून ती मानवी हक्कांच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला.
तांत्रिक त्रुटी :
सध्याच्या डिजिटल मीटरमध्येच अनेक तांत्रिक अडचणी येत असताना स्मार्ट मीटरमुळे अवाढव्य वीजबिलांचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
खाजगीकरणाचा आरोप :
या योजनेच्या माध्यमातून वीज वितरण क्षेत्राच्या खाजगीकरणाचा मार्ग मोकळा केला जात असल्याचा आरोपही पक्षाने केला असून त्यामुळे भविष्यात सरकारी नोकऱ्या आणि आरक्षण व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
आंदोलनाचा इशारा
महावितरण प्रशासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा सरचिटणीस रविकांत मोरे, नवीन शहराध्यक्ष संतोष उनवणे, शहर उपाध्यक्ष अनिस गंगापूरकर, इकबाल खान, पूर्व शहराध्यक्ष बाबर खान, शहर संघटक रमजानी शहा, शेख आसेफ, हनु नाना, मोहन गायकवाड, अशोक गायकवाड, असेफ चाऊस, बादशहा लखपती, कलीम खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
