संगमनेरच्या नान्नजची झेप थेट दिल्लीपर्यंत..! शिक्षकाच्या लेकीने UPSC जिंकले ऋतुजा गायकवाड देशात १०६ वी..ग्रामीण भागातून देशाच्या सर्वोच्च सेवेत झेप..संगमनेर तालुक्याची उंचावली मान
संगमनेर (प्रतिनिधी/दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कु. ऋतुजा अशोक गायकवाड हिने संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2025 च्या परीक्षेत देशात 106 वा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची IAS (भारतीय प्रशासकीय सेवा) पदासाठी निवड निश्चित झाली असून संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ऋतुजा ही नान्नज दुमाला येथील आदर्श शिक्षक अशोक लक्ष्मण गायकवाड यांची कन्या आहे. ग्रामीण वातावरणात शिक्षण घेत असतानाही तिने कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत यश मिळवून दाखवले. तिच्या या यशामुळे गाव, तालुका आणि जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला सारख्या छोट्या गावातून देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेत पोहोचलेली ऋतुजा ही अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी तिची मेहनत आणि चिकाटी हा आदर्श ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.ऋतुजाच्या या उज्ज्वल यशाबद्दल गायकवाड कुटुंबीयांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. भविष्यात ती आपल्या कार्यातून समाजासाठी मोठे योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
